पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाने गेल्या सात वर्षांत नऊ लाख ६४ हजार ११७ वृक्षांची शहराच्या विविध भागांत लागवड केल्याचा दावा केला आहे. उद्यान आणि वृक्षसंवर्धन विभागाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने ११ जूनपर्यंत वृक्षारोपण सप्ताहाचे आयोजन करून यंदा शहरात आणखी दीड लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याचा प्रारंभ बुधवारपासून करण्यात आला.
उद्यान व वृक्षसंवर्धन विभागामार्फत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या वर्षभरात आठही क्षेत्रीय कार्यालये, दुर्गादेवी उद्यान, माेकळी जागा, पिंपरी, औंध, पिंपळे निलख, सीएमई, देहूराेड, दिघी सैनिक हद्द, चिंचवड जाॅगर्स पार्कसह आदी भागांत सुमारे दीड लाख देशी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. यासाठी ४ ते ११ जूनपर्यंत वृक्षारोपण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे जतन अधिनियमानुसार रस्त्याच्या कडेने किती वृक्ष असावेत, याबाबत मानक निश्चित करण्यात आले आहेत. २४ मीटर व अधिक रुंदीचे रस्ते असल्यास दर दहा मीटर अंतरावर एक वृक्ष असणे आवश्यक आहे. बारा ते २४ मीटर रुंदीचे रस्ते असतील, तर रस्त्याच्या दुतर्फा दहा मीटर अंतरावर एक वृक्ष, सहा ते बारा मीटर रुंदीच्या रस्त्यावर दर २० मीटर अंतरावर एक वृक्ष असला पाहिजे. हे निकष पिंपरी-चिंचवड महापालिका पूर्ण करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शहरात ३२ लाख वृक्ष
शहरात लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची माहिती मिळावी यासाठी भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे (जीआयएस टॅगिंग) करून वृक्षांची गणना करण्यात आली आहे. या गणनेत शहरात ३२ लाख १६ हजार ७९९ वृक्ष असल्याचे दिसून आल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
किती रोपे जगली?
वृक्षारोपणाची माहिती महापालिकेने दिली असली, तरी गेल्या वर्षी लावलेल्या रोपांपैकी किती जगली, याची माहिती उद्यान विभागाने ठेवलेली नाही. ‘वृक्षारोपणात कमी उंचीची आणि जास्त दिवस जगत नसलेली रोपे लावली जातात. महापालिकेकडून वृक्षारोपणाचा सोपस्कार पूर्ण केला जातो. त्यानंतर रोपांची निगा राखली जात नाही. शास्त्रोक्त पद्धतीने वृक्षारोपण करावे. किती जगले, जळाले त्याची नोंद ठेवावी,’ अशी मागणी प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केली. त्याबाबत विचारले असता, ‘किती वृक्ष जगले, जळाले याची नाेंद नाही. यंदापासून जगलेल्या वृक्षांची नाेंद ठेवण्यात येणार आहे,’ असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उद्यान विभागाचे सहायक आयुक्त उमेश ढाकणे यांनी सांगितले.
वृक्ष हे प्राणवायूचे स्रोत, छाया व जैवविविधतेचे रक्षण करणारे घटक आहेत. पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी नागरिकांनी दर वर्षी किमान एक तरी देशी वृक्ष लावून त्याचे संवर्धन करावे. वृक्षारोपण सप्ताहात महिलांचे, शालेय विद्यार्थ्यांचे, नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर योगदान अपेक्षित आहे. – प्रदीप जांभळे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका