सध्या करोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, अनेक नागरीक तोंडाला पाणी आणणारे चटपटीत भेळ, दहीपुरी, शेवपुरी व पाणीपुरी आदी आपल्या आवडीचे पदार्थ मनावर दगड ठेवून खाण्याचे टाळत आहेत. अशावेळी पिंपरी-चिंचवडमधील पाणीपुरी प्रेमींच्या चिभेचे चोचले पुरवण्यासाठी ऑटोमॅटिक मशीनद्वारे हायजेनिक पाणीपुरी उपलब्ध झाली आहे. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घेण्यात आलेली सर्वोतोपरी खबरदारी पाहता, नागरिकांची या पाणीपुरीची चव चाखण्यासाठी मोठ्यासंख्येने गर्दी होत आहे.
पाणीपुरीचे ऑटोमॅटिक मशीन असून त्याद्वारे ग्राहकांना हायजेनिक पाणीपुरी मिळत आहे. नामांकित कंपनीत काम करणारे आणि उच्च शिक्षित असलेल्या पाच तरुणांनी ही संकल्पना पुढे आणली असून, त्यांनी हा हायजेनिक पाणीपुरीचा व्यवसाय सुरू केला आहे. सध्या हा व्यवसाय त्याच्या घरातील महिला सांभाळत आहेत. यातून काही तरुणांना रोजगार देखील मिळत असल्याचं पाणीपुरी व्यवसायिक सारिका तूपकारी यांनी सांगितलं आहे.
पाणीपुरी हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून मनावर दगड ठेवून पाणीपुरीकडे न पाहिलेल्या आणि आस्वाद न घेतलेल्या खवय्यांसाठी, पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी येथे क्लीन अॅण्ड क्रंची हायजेनिक पाणीपुरी मिळू लागली आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खव्वयांसाठी हा उत्तम पर्याय असल्याचं पाहायला मिळत असल्याने, अनेक पाणीपुरी प्रेमी दुकानावर गर्दी करत आहेत. ऑटोमॅटिक मशीन असल्याने स्पर्शविरहित पाणीपुरी ग्राहकांना या ठिकणी मिळत आहे. मशीनच्या नोझल जवळ सेन्सर बसवलं गेलं असून आपल्या आवडीच्या फ्लेवरचे पाणी पुरीमध्ये भरता येतं, तेही स्पर्श न करता.
एकीकडे नेहमी ठेल्यावरची पाणीपुरी खाणारे खवय्ये आता करोना महामारीमुळे स्वच्छतेचा विचार करत आहेत. हात बुडवून पाणीपुरी खाण्याचा विचार सध्या मनात डोकावत देखील नाही. एरव्ही पाणीपुरी देणारा व्यक्ती हातात पुरी घेऊन तो आंबट गोड पाण्यात पुरी बुडवून द्यायचा. हे सर्व अगदी किळसवाणे वाटायचे. परंतु, आता अटोमॅटिक मशीन असल्याने केवळ नोझलला पुरी लावली की हवं असलेल आंबटगोड पाणी थेट पुरीमध्ये पडत आहे, यामुळे करोनाची भीती मनात राहात नाही. करोनाच्या या महामारीत चटपटीत आणि हवी-हवीशी वाटणारी पाणीपुरी खाण्याचा मोह कोणीच आवरू शकत नसल्याने हायजेनिक आणि स्वच्छतेला प्राधान्य दिलेली ऑटोमॅटिक मशीन मधील पाणीपुरी सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
ग्राहकांचा चांगला प्रतिसाद –
“करोनामुळे बाहेरील पदार्थ खाणे नागरीक टाळत आहेत. पाणीपुरी हा जिव्हाळ्याचा विषय असून स्पर्शविरहित पद्धतीने ती देण्याचं ठरवलं. ऑटोमॅटिक पाणीपुरीचे मशीन आणले आहे. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद असून करोनामुळे दुकानात स्वच्छता ठेवली जात आहे.” – सारिका तूपकारी, पाणी पुरी व्यवसायिक
करोनाची भीती नाही –
“हा उपक्रम खूप आवडला आहे. स्पर्शविरहित असल्याने करोनापासून पूर्ण संरक्षण आहे. करोनाची भीती नाही. अनेकांनी अशा पद्धतीने व्यवसाय केल्यास पाणीपुरी खाणाऱ्यांची इच्छा देखील पूर्ण होईल.” स्वाती ब्रह्मे, ग्राहक
