पिंपरी: पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत अव्वल कामगिरी करणाऱ्या गुंडा विरोधी पथकाला पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केल आहे. पाहिजे आणि फरार आरोपींचा शोध घेण्यात गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या टीमला यश आलेले आहे. त्यांच्या टीमला १३० गुण पोलिस आयुक्तांनी दिले. दुसऱ्या क्रमांकावर गुन्हे शाखा युनिट तीन आणि तृतीय क्रमांकावर गुन्हे शाखा युनिट एक यांचा समावेश आहे.
फेब्रुवारी २०२३ ते मार्च २०२३ यादरम्यान पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत फरार आणि पाहिजे आरोपी पकडण्याबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्हे शाखा आणि गुंडा विरोधी पथकाला आदेश दिले होते. गुंडा विरोधी पथकाने गेल्या दहा वर्षापासून पाहिजे असलेल्या आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस आयुक्त चौबे यांनी पाहिजे आरोपीला ५ गुण तर फरार आरोपीला पकडल्यास २५ देणार होते. गुंडा विरोधी पथकाने एकूण २१ पाहिजे आणि फरार आरोपींना पकडून १३० गुणांची कमाई केली. पोलिस आयुक्तालयात अव्वल नंबर मिळवला आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शहरातील गुंडगिरी कमी करण्यासाठी आदेश दिले होते. शहरातील समूळ गुन्हेगारी कमी करण्याबाबत वारंवार पोलिस आयुक्तांनी आदेश दिले.



