पिंपरी पालिकेच्या जकात उत्पन्नाची ७६ लाखापासून ११५० कोटींपर्यंत झेप

पिंपरी-चिंचवड नगरपालिका व त्यानंतर झालेल्या ‘श्रीमंत’ महापालिकेचा १९७१ ते २०१३ या कालावधीतील ४२ वर्षांचा प्रवास पाहता जकातीच्या माध्यमातून ७६ लाखाच्या उत्पन्नाने सुरुवात झाल्यानंतर अखेरच्या वर्षांत ११५० कोटी रुपयांपर्यंत झेप घेतली असल्याचे दिसून येते.

पिंपरी-चिंचवड नगरपालिका व त्यानंतर झालेल्या ‘श्रीमंत’ महापालिकेचा १९७१ ते २०१३ या कालावधीतील ४२ वर्षांचा प्रवास पाहता जकातीच्या माध्यमातून ७६ लाखाच्या उत्पन्नाने सुरुवात झाल्यानंतर अखेरच्या वर्षांत ११५० कोटी रुपयांपर्यंत झेप घेतली असल्याचे दिसून येते. महापालिकेने २०११-१२ या आर्थिक वर्षांत तब्बल १२२८ कोटी ८५ लाख रुपयांचे सर्वाधिक उत्पन्न मिळविले आहे.
िपपरी-चिंचवड ही सुरुवातीला नगरपालिका होती. १९८२ मध्ये तिचे महापालिकेत रूपांतर झाले. आजमितीला शहराची लोकसंख्या १८ लाखाच्या घरात असून उद्योगनगरी, कामगारनगरी, श्रीमंतनगरी यासह सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर म्हणून िपपरी-चिंचवडकडे पाहिले जाते. महापालिकेला जकातीतून मिळणाऱ्या भरघोस उत्पन्नामुळे पालिकेच्या श्रीमंतीचा रुबाब राहिला व शहराचा कायापालटही झाला. महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या नोंदीनुसार, १९७१-७२ मध्ये ७६ लाख ९२ हजार रुपये जकातीचे उत्पन्न मिळाले होते. दुसऱ्याच आर्थिक वर्षांत १ कोटी २५ लाख, तिसऱ्या वर्षी १ कोटी ५० लाख, चौथ्या वर्षी एक कोटी ९७ लाख रुपये उत्पन्न मिळाले. १९७५-७६ मध्ये अडीच कोटींचा टप्पा ओलांडण्यात यश आले. दहाव्या वर्षी म्हणजेच १९८०-८१ मध्ये ८ कोटी ८९ लाख रुपये उत्पन्न पदरात पडले. पुढच्याच वर्षांत नगरपालिकेने दहा कोटींचा टप्पा ओलांडला.
महापालिकेची स्थापना झाल्यानंतर वेगाने उत्पन्नवाढ दिसू लागली. १९८५-८६ मध्ये २१ कोटी १६ लाख, १९८८-८९ मध्ये ३१ कोटी ६० लाख, १९८९-९० मध्ये ४३ कोटी ९८ लाख, १९९०-९१ मध्ये ६४ कोटी ७५ लाख, १९९४-९५ मध्ये उत्पन्नाचा आकडा १०० कोटींच्या घरात गेला. १९९५-९६ मध्ये १३३ कोटी, तर १९९६-९७ मध्ये १५० कोटींचा टप्पा ओलांडला. २००१-०२ पर्यंत १५७ कोटींपर्यंत रेंगाळत पडलेले उत्पन्न २००२-०३ मध्ये एकदम २६९ कोटीपर्यंत गेले. त्यानंतर पालिकेची गाडी एकदम सुसाट सुटली. २००४-२००५ मध्ये ३७६ कोटी, २००५-०६ मध्ये ५२५ कोटी, २००६-०७ मध्ये ६७१ कोटी, २००७-०८ मध्ये ७७९ कोटी, २०१०-११ मध्ये ९१३ कोटी, २०११-१२ मध्ये १२२८ कोटी आणि २०१२-१३ या आर्थिक वर्षांत ११५० कोटी रुपये उत्पन्न मिळाले. आता एक एप्रिल २०१३ पासून जकात बंद करण्यात आली असून यापुढे स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू करण्यात आला आहे. यापुढील काळात जकात नाके बंद होणार आहेत. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षांत जकातीतून १२०० कोटीपर्यंतचे उत्पन्न मिळवण्याचे अवघड आव्हान पालिकेसमोर आहे, ते पेलता आले नाही तर वर्षांनुवर्षे जोपासलेली ‘श्रीमंती’ धोक्यात येणार असून सगळेच अवघड होऊन बसणार आहे.
———

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pimpri corp octroi jumped over rs 1150 cr from 76 lakhs