आय.ए.एस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या पिंपरीच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. जिवंत नवजात बाळाचा स्मशान दाखला तयार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहेत. हा सर्व प्रकार २३ जुलै सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांचा आहे.
वायसीएम रुग्णालयात महिलेने नवजात बालकाला जन्म दिला. त्या नवजात बाळाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. काही मिनिटांत त्याचा स्मशान दाखला तयार करण्यात आला. परंतु, नवजात बाळ हे जिवंत असून आयसीयूमध्ये उपचार घेत असल्याचं कागदपत्रांमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अशा गलथान कारभार करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईची मागणी होत आहे. एकीकडे महाराष्ट्रात पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी देखील या कामगिरीचं कौतुक केलं आहे. तर, दुसऱ्या काळ्या बाजूचं समर्थन होऊ शकत नाही. संबंधित डॉक्टरांवर कारवाईची मागणी होत आहे. याकडे आयुक्त शेखर सिंह यांनी लक्ष द्यायला हवं आहे.
हेही वाचा – पुणे: तळेगाव गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद; ४ पिस्तुल अन् १२ जिवंत काडतुसे जप्त
जिवंत नवजात बाळाचा स्मशान दाखल तयार केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. हे सुंदर जग बघण्याआधीच डॉक्टरांनी त्या नवजात बाळाला मृत घोषित कस केलं? याप्रकरणी वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे यांच्याशी संपर्क केला, मात्र तो होऊ शकला नाही. आरोग्य अधिकारी गोफणे यांनी याबाबत माहिती घेऊन सांगतो, अस म्हणत वेळ मारून नेली आहे. एकूणच या प्रकरणी वायसीएम रुग्णालय असेल किंवा महानगरपालिकेचा आरोग्य विभाग हे गंभीर नाहीत असे स्पष्ट होत आहे. आयुक्त शेखर सिंह यांनीच कठोर पावलं उचलत कारवाई करण्याची मागणी होत आहे.
कागदपत्रांमध्ये काय नमूद आहे?
२३ जुलै २०२४ रोजी महिलेने ५ वाजून २० मिनिटांनी बाळाला जन्म दिला. ते बाळ मृत जन्माला आल्याचं त्या कागदपत्रांमध्ये नमूद आहे. मग, संध्याकाळी ७ वाजून ३७ मिनिटाला त्या बाळाचा स्मशान दाखला तयार करण्यात आला. ८:५६ ला बाळावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.
© The Indian Express (P) Ltd