पिंपरी : दुबईतून सायबर फसवणुकीचे जाळे चालवणाऱ्या मुख्य आरोपीला पिंपरी -चिंचवड सायबर पोलिसांनी इंटरपोलच्या सहाय्याने अटक केले. आरोपी चिनी सायबर गुन्हेगारांबरोबर मिळून म्युुल बँक खात्यांच्या माध्यमातून कोट्यावधीची अफरातफर करत होता. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. सुमंत उर्फ नानू रविंद्र दसरे (वय २६, रा. निगडी प्राधिकरण) असे दुबईतून अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासोबत त्याचे साथीदार तुषार अमराराम चौधरी (वय २९, रा. मोरे वस्ती, चिखली), आदर्श संतोष वाघमारे (वय २७, रा. आकुर्डी) यांनाही अटक करण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुक्तालयाच्या हद्दीत ऑनलाइन फसवणूक आणि बनावट बँक खात्यांच्या वापराशी संबंधित एकूण ९३ गुन्हे दाखल आहेत. सायबर पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात पोलिसांनी बँक खाती पुरवणाऱ्या टोळीचा शोध सुरू केला. यात तनिष्क आणि आदर्शला अटक करण्यात आली. चौकशीत दोन्ही आरोपी वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडून त्याची माहिती दुबईत बसलेला त्यांचा साथीदार सुमंत याला देत असत.
सुमंत या खात्यांवर सायबर फसवणुकीचे पैसे मागवत असे. तुषार आणि आदर्श कमिशन कापून उरलेली रक्कम एटीएम आणि सीडीएमद्वारे दुबईत पाठवत होते. आरोपी सुमंत विरोधात ‘लुक आउट सर्कुलर’ (एलओसी) जारी करण्यात आले होते. याच एलओसीच्या आधारे इंटरपोलच्या मदतीने सुमंत याला दुबईत ताब्यात घेण्यात आले. दुबईतून डि-पोर्ट केल्यानंतर मुंबई विमानतळावर सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी आणि त्यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.
चिनी सायबर गुन्हेगारांबरोबर भागीदारी
प्राथमिक चौकशीत आरोपी सुमंत सुरुवातीला शेअर ट्रेडिंग आणि टास्क फसवणुकीसाठी दूरध्वनी, संदेश पाठविण्याचे काम करत होता. यात त्याला पीडितांकडून फसवणुकीच्या रकमेपैकी चार टक्के कमिशन मिळत होते. यानंतर त्याने चिनी आरोपींकडून इंटरनॅशनल कार्डस घेऊन मॉल्समध्ये स्वाइप करून महागड्या वस्तू खरेदी करण्यास सुरुवात केली. सायबर फसवणुकीची संपूर्ण प्रक्रिया समजल्यानंतर त्याने चिनी आरोपींबरोबर भागीदारी केली आणि फसवणुकीच्या रकमेचा २० टक्के हिस्सा वसूल करू लागला. या अवैध कामासाठी त्याने तुषार आणि आदर्श यांच्यामार्फत १५० हून अधिक बँक खाती मिळवली होती. त्याने आतापर्यंत एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम कमावल्याची कबुली दिली आहे. आरोपीविरोधात हैदराबाद (तेलंगणा) आणि काळेवाडी (पिंपरी-चिंचवड) पोलीस ठाण्यातही आधीपासून गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली असून दुबईत सुरू असलेले कॉल सेंटर व इतर साथीदारांबद्दल सखोल तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
