पिंपरी : पिंपरी डेअरी फार्म येथील उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर असून, रेल्वे क्रॉसिंगवर स्टील गर्डर टाकण्याचे काम सुरू झाले आहे. येत्या २१ मार्चपर्यंत दररोज दोन तास ब्लॉक घेऊन काम पूर्ण करण्यात येणार आहे. उर्वरित काम एप्रिलअखेर पूर्ण करून उड्डाणपूल खुला करण्याचे नियोजन असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.
पिंपळे सौदागर, रहाटणी, पिंपरी कॅम्पमार्गे पिंपरी गावातून पुणे-मुंबई महामार्गावर जाण्यासाठी वाहनांना पिंपरी डेअरी फार्म रस्त्याने बाहेर पडावे लागत होते. तर, पुणे-मुंबई महामार्गावरून पिंपरी कॅम्प व पिंपरी गावातून पुढे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागत होता. लोहमार्गावर फाटक पडल्यानंतर दोन्ही बाजूंनी वाहतूककोंडी होत होती. पिंपरी व परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि कोंडी दूर करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बीआरटी स्थापत्य प्रकल्प विभागामार्फत पिंपरी डेअरी फार्म रस्त्यावर १ हजार २९० मीटर लांब व १७.२० मीटर रुंदीचा उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
ठेकेदाराला दोनदा मुदतवाढ
उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाला २१ मार्च २०२३ रोजी कार्यादेश देण्यात आला होता. कामाची मुदत दोन वर्षांची, म्हणजेच ३१ मार्च २०२५ पर्यंत होती. काम मुदतीत पूर्ण झाले नाही. पुलाच्या जागेत अडथळा ठरणाऱ्या वृक्षांमुळे आणि रेल्वे विभागाशी संबंधित विविध परवानग्यांमुळे कामाला विलंब झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला. त्यामुळे ठेकेदाराला दाेन वेळा मुदतवाढ देण्यात आली. आता एप्रिलअखेर काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे स्थापत्य विभागाने सांगितले.
वाहनचालकांना दिलासा
पिंपरी डेअरी फार्म येथील लोहमार्गावरील पुलामुळे वाहतूक विनाअडथळा होणार आहे. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी आणि पिंपरी गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. याशिवाय सुविधा, सुरक्षितता आणि इंधन बचतीच्या दृष्टीने फायदा होणार असून, पुणे-मुंबई महामार्गावर, तसेच संत तुकारामनगर मेट्रो स्थानकापर्यंत जलद आणि सहजपणे पोहोचण्यासाठी मदत होणार आहे.
रेल्वे प्रशासनाच्या नियंत्रणाखाली डेअरी फार्म येथे रेल्वे क्रॉसिंगवर स्टील गर्डर टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. दररोज दोन तास रेल्वे ब्लॉक घेऊन एकूण सात गर्डर टाकण्यात येणार आहेत. दररोज दोन गर्डर ठेवून त्यांची जोडणी करण्यात येणार आहे. त्यावर २१ मार्चनंतर स्लॅब टाकण्यात येणार आहे. या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर पिंपरी व परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुकर होऊन वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता विजय भाेजने म्हणाले.
