पिंपरी : पिंपरी व परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि वाहतूक कोंडी दूर करण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या वतीने पिंपरी डेअरी फार्म येथे उभारण्यात येत असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची तीनदा मुदतवाढ संपल्यानंतरही पुलाचे काम अपूर्णच आहे. संबंधित ठेकेदाराची भाववाढ गाेठविण्यात आली असून ऑगस्टअखेर काम पूर्ण न केल्यास एक सप्टेंबरपासून प्रतिदिन एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. हा उड्डाणपूल खुला हाेण्यासाठी नागरिकांना आणखी काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पिंपळे सौदागर, रहाटणी, पिंपरी कॅम्प मार्गे पिंपरी गावातून पुणे-मुंबई महामार्गावर जाण्यासाठी वाहनांना पिंपरी डेअरी फार्म रस्त्याने बाहेर पडावे लागत होते. पुणे-मुंबई महामार्गाने पिंपरी कॅम्प व पिंपरी गावातून पुढे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागत होता. लोहमार्गावर फाटक पडल्यानंतर दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी होत होती. पिंपरी व परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि वाहतूक कोंडी दूर करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागामार्फत पिंपरी डेअरी फार्म रस्त्यावर एक हजार २९० मीटर लांबी व १७.२० मीटर रुंदीचा उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या पुलासाठी ६५ काेटी २८ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली हाेती. ३१ मार्च २०२३ रोजी संबंधित ठेकेदाराला कामाचा कार्यादेश देण्यात आला.

विविध परवानग्यांमुळे कामाला विलंब झाल्याचा दावा

मुदतीनुसार ३१ मार्च २०२५ मध्ये या उड्डाणपुलाचे काम पूर्ण हाेणे अपेक्षित हाेते. मात्र, पुलाच्या जागेत अडथळा ठरणाऱ्या वृक्षांमुळे आणि रेल्वे विभागाशी संबंधित विविध परवानग्यांमुळे कामाला विलंब झाल्याचा दावा प्रशासनाचा आहे. २४ महिन्यांच्या मुदतीत केवळ ६० टक्के काम पूर्ण झाले होते. त्यामुळे ठेकेदाराला ३० नाेव्हेंबर २०२५ पर्यंत पहिली मुदतवाढ दिली. या मुदतीमध्ये काम पूर्ण न झाल्यामुळे त्यानंतर ३० एप्रिल २०२६ पर्यंत दुसरी मुदतवाढ देण्यात आली. मात्र, या मुदतीतही काम पूर्ण न झाल्याने तीन महिन्यांची तिसरी मुदतवाढ दिली. ही मुदत संपूनही कामाला विलंब हाेत असल्याने स्थापत्य प्रकल्प विभागाने संबंधित ठेकेदाराला ऑगस्टअखेर काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

रेल्वे फाटक बंद

पिंपरी डेअरी फार्म येथील लोहमार्गावर उभारण्यात येणाऱ्या पुलामुळे विना अडथळा वाहतुकीस चालना मिळणार आहे. यामुळे नोकरी, व्यवसाय किंवा अन्य कामांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांचा वेळ वाचणार आहे. हा पूल सुरू झाल्यानंतर डेअरी फार्म येथील रेल्वेचे फाटक बंद केले जाणार आहे.

कामातील अडथळ्यांमुळे ठेकेदाराला तीनवेळा मुदतवाढ दिली होती. पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पावसामुळे कामाला मर्यादा येत आहे. ऑगस्टअखेर ठेकेदाराने काम पूर्ण न केल्यास एक सप्टेंबरपासून दंड आकारण्यात येणार आहे. ठेकेदाराची भाववाढ गाेठविण्यात आली असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता विजय भाेजने यांनी सांगितले.