पिंपरी : पिंपरी व परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि वाहतूक कोंडी दूर करण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या वतीने पिंपरी डेअरी फार्म येथे उभारण्यात येत असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची २४ महिन्यांची मुदत संपून आता एक वर्ष झाले आहे. त्यानंतरही पुलाचे काम अपूर्ण आहे. पुलाचे उर्वरित १५ टक्के कामासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल खुला हाेण्यासाठी नागरिकांना आणखी काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पिंपळे सौदागर, रहाटणी, पिंपरी कॅम्पमार्गे पिंपरी गावातून पुणे-मुंबई महामार्गावर जाण्यासाठी वाहनांना पिंपरी डेअरी फार्म रस्त्याने बाहेर पडावे लागत होते. पुणे-मुंबई महामार्गाने पिंपरी कॅम्प व पिंपरी गावातून पुढे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागत होता. लोहमार्गावर फाटक पडल्यानंतर दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी होत होती. पिंपरी व परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि वाहतूक कोंडी दूर करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागामार्फत पिंपरी डेअरी फार्म रस्त्यावर एक हजार २९० मीटर लांबी व १७.२० मीटर रुंदीचा उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ३१ मार्च २०२३ रोजी कामाला सुरुवात करण्यात आली. या पुलासाठी ६५ काेटी २८ लाख रूपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली हाेती.
विविध परवानग्यांमुळे कामाला विलंब झाल्याचा दावा
मुदतीनुसार ३१ मार्च २०२५ मध्ये या उड्डाणपुलाचे काम पूर्ण हाेणे अपेक्षित हाेते. मात्र, पुलाच्या जागेत अडथळा ठरणाऱ्या वृक्षांमुळे आणि रेल्वे विभागाशी संबंधित विविध परवानग्यांमुळे कामाला विलंब झाल्याचा दावा प्रशासनाचा आहे. त्यामुळे ठेकेदाराला ३० नाेव्हेंबर २०२५ पर्यंत पहिली मुदतवाढ दिली. या मुदतीमध्ये काम पूर्ण न झाल्यामुळे त्यानंतर ३० एप्रिल २०२६ पर्यंत दुसरी मुदतवाढ देण्यात आली. मात्र, आतापर्यंत ८५ टक्केच काम पूर्ण झाल्यामुळे आता पुन्हा तिसरी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव आहे.
दर १५ दिवसांनी अहवाल
डेअरी फार्म उड्डाणपूल प्रकल्पांतर्गत पावसाळ्यापूर्वीची सर्व महत्त्वाची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. प्रकल्प परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण, पाणी निचरा व्यवस्था आदी कामांवर भर द्यावा. या कामांचा प्रगती अहवाल दर १५ दिवसांनी सादर करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत.
पुलाची उर्वरित कामे निर्धारित वेळेत पूर्ण केली जाणार आहेत. आवश्यक अंदाजपत्रकीय तरतुदींसाठी सर्व प्रशासकीय आणि तांत्रिक बाबींची तत्काळ पूर्तता करून उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी सांगितले.
