पिंपरी : आजारपणाला कंटाळून राहत्या इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून उडी मारून आईने मुलासह आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी डांगे चौक येथे घडली. माझ्या मुलाला माझी आठवण येईल ( मिस करेल) यामुळे त्याच्यासह आत्महत्या करीत असल्याचे महिलेने चिठ्ठीत लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले.
एकता मनोज भांगड (वय ३३) आणि माधव मनोज भांगड (वय ६, रा.डांगे चौक) असे मुलासह आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांगड कुटूंबीय मूळचे राजस्थानचे असून गेल्या दोन वर्षांपासून डांगे चौकातील एका सोसायटीत वास्तव्यास होते. महिला गृहिणी होती. तिचे पती येरवडा येथील एका नामांकित आयटी कंपनीत अभियंता पदावर कार्यरत आहेत.
शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक इमारतीच्या अंतर्गत डक्टमधून प्रचंड मोठा आवाज झाला. आवाजामुळे रहिवाशांनी तातडीने खाली धाव घेतली असता महिला व तिचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्याचे दिसले. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी इमारतीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पडताळणी केली असता, संबंधित महिला मुलाला सोबत घेऊन उद्घवाहकाने (लिफ्ट) थेट १८ व्या मजल्यावर जाताना दिसले. पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. त्यात आजारपणाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. माझ्या मुलाला माझी आठवण येईल. त्यामुळे त्याच्यासह आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत लिहिले असल्याचे वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी सांगितले. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.संबंधित कुटुंबाच्या नातेवाइकांना घटनेची माहिती देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
