पिंपरी : मद्यधुंद अवस्थेतील मोटारचालकाने बेदरकारपणे वाहन चालवून एका वाहनाला धडक दिल्यानंतर मोटार रस्ता दुभाजकावर आदळली. त्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांशी हुज्जत घालत चालकाने भररस्त्यात त्यांना शिवीगाळ केली. हा प्रकार औंध-हिंजवडी बीआरटी मार्गावर रविवारी घडला. यावेळी संबंधित चालकाने ‘तुमच्या आयुक्तांना बोलवा, मी इथेच आहे, असे म्हणत पोलिसांना अरेरावी केली.

चालकाने पोलिसांना धक्काबुक्की करीत शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणला असताना वाकड पोलिसांनी बेदरकारपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.चालक हा मद्यधुंद अवस्थेत औंध-हिंजवडी बीआरटी मार्गावर मोटार चालवत होता. त्याच्या मोटारीची एका वाहनाला धडक बसली. त्यानंतर त्याचे मोटारीवरील नियंत्रण सुटले आणि मोटार रस्त्यावरील दुभाजकावर जाऊन आदळली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चालकाला मद्यधुंद अवस्थेत तसेच इतर वाहनचालकांच्या जीविताला धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने वाहन चालवू नये, असे सांगत समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पोलिसांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

पोलिसांना उद्देशून शिवीगाळ केली. ‘तुमच्या आयुक्ताला बोलवा, मी इथेच आहे,’ असे म्हणत पोलिसांशी वाद घातला. पोलिसांच्या अंगावर जाण्याचाही त्याने प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकाराचे काही नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. ‘मी मराठी आहे. तुम्हाला लाज वाटते का ? असे म्हणत तो पोलिसांशी वाद घालत असल्याचेही चित्रफितीत दिसून येत आहे.

आधी दादागिरी नंतर दिलगिरी

या घटनेनंतर काही तासांनी चालकाने स्वत:ची एक चित्रफीत तयार करून पोलिसांची जाहीर माफी मागितली. घटनेच्या वेळी आपल्याकडून झालेले वक्तव्य चुकून झाल्याचे सांगत त्याने आपल्या वर्तनाबद्दल दलिगिरी व्यक्त केली. ‘मी जे बोललो ते अनावधानाने झाले,’ असे त्याने म्हटले आहे.