पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २१ पिंपरीगावमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या घरावर आठ जणांच्या टोळक्याने हल्ला केला. शिवीगाळ करत ‘तुम्ही आमच्या विरोधात उमेदवार उभे करण्याचे धाडस का केले, तुम्हाला जीवे मारुन टाकू’ अशी धमकी देऊन विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भाजप उमेदवाराच्या समर्थकांनी हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले असून पिंपरी पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ३३ वर्षीय डॉक्टर महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, सोमवारी रात्री आरोपी घरासमोर आले. आमच्या विरोधात उमेदवार उभे करण्याचे धाडस का केले. तुम्हाला जीवे मारुन टाकू अशी धमकी दिली. शिवीगाळ केली. आमच्या परवानगी शिवाय घरात प्रवेश केला. चुलत सासरे यांना अश्लील शिवीगाळ केली. सासूला ढकलून दिले. त्यात त्या खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला व हाताला मार लागला आहे.
चुलत दिराला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. घरासमोर असलेले पाण्याचे जार इतर लोकांच्या घरांवर फेकले. काही जार घरासमोर रस्त्यावर फेकून दिले. दुचाकी ढकलून दिल्या. शिवीगाळ करत पाण्याचे जार घेऊन कुटुंबाना मारण्यासाठी धावले. आरोपी हे विरोधी भाजपच्या उमेदवाराचे समर्थक आणि कार्यकर्ते असल्याचा त्यांचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडीओही फिर्यादीकडून पोलिसांकडे सादर करण्यात आले आहेत. त्याच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
दरम्यान, प्रभाग क्रमांक २१ हा संवेदनशील घोषित करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांनी दोन दिवसांपूर्वीच केली आहे. आता घटनेने प्रशासकीय यंत्रणा कोणता निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी दोन दिवस शिल्लक असतानाच ही घटना घडल्याने मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप नेत्यांची दहशत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार तसेच उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून सातत्याने केला जात आहे. महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे प्रचाराचा जोर वाढला आहे. मंगळवारी प्रचार थांबणार आहे. गुरुवारी मतदान आणि शुक्रवारी मतमोजणी होणार आहे.
