पिंपरी : जमीन खरेदी विक्री (रिअल इस्टेटच्या) प्रकरणात पत्नीवर गुन्हा दाखल झाला. या कारणावरून पती-पत्नीत वाद झाले. त्यानंतर पतीने टोकाचे पाऊल उचलत विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना चऱ्होली येथे घडली.
कुमार ऐश्वर्य (३९, च-होली बुद्रुक) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कुमार यांची पत्नी या जमीन खरेदी विक्री (रिअल इस्टेटचे) काम करतात. त्यांच्यावर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे कुमार हे तणावात होते. या कारणावरून २९ जानेवारी रोजी पती-पत्नीमध्ये वादही झाला. त्यानंतर पती कुमार यांनी विषारी औषध प्राशन केले. त्यामुळे त्यांना रक्ताच्या उलट्या व जुलाब होऊ लागले. ही बाब पत्नीच्या लक्षात येताच त्यांनी कुमार यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत होती. मात्र अचानक प्रकृती गंभीर झाली अन् उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दिघी पोलीस तपास करत आहेत.
पिंपरीतील दहा पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या
पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील दहा पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले आहेत.
दापोडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव कोळी यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. त्यांच्या जागी वाहतूक शाखेतील विजय वाघमारे आले आहेत. चिंचवडचे पोलीस निरीक्षक अंकुश बांगर यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली असून वाहतूक शाखेतून दत्तात्रय चासकर यांची चिंचवड पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातून पोलीस निरीक्षक संजय नरावाड आणि महेंद्र कदम यांची विशेष शाखेत बदली झाली आहे.
संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली झाली असून त्यांच्या जागी गुन्हे शाखेचे सुहास आव्हाड यांची बदली झाली आहे. निगडी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक संजय चव्हाण आणि विशेष शाखेतील संदीप सावंत यांची गुन्हे शाखेत बदली झाली आहे.

