पिंपरी : प्रेयसीसोबत किरकोळ कारणावरून वाद झाल्याने मद्यधुंद अवस्थेतील प्रियकर थेट शंभर फूट उंच मोबाईल टॉवरवर चढला आणि त्याला खाली उतरवण्यासाठी नातेवाईकांसह पोलीस, अग्निशमन दलाची एकच धांदलउडाली. सर्वांनी विनवण्या केल्या. मात्र, प्रियकर ऐकायला तयार नव्हता. अखेर प्रेयसीला हातात हार घेऊन लग्नासाठी होकार द्यायला लावण्यात आला. त्यानंतर प्रियकराने खाली उतरण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर तब्बल पावणेचार तासानंतर क्रेनच्या सहाय्याने त्याला खाली उतरविण्यात आले आणि या नाट्याची सुखद अखेर झाली. हा प्रकार रविवारी मामुर्डी येथे घडला.

२२ वर्षीय प्रियकर मूळचा आसामचा आहे. त्याचे शेजारी राहणार्‍या तरुणीसोबत प्रेमसंबंध आहेत. दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत प्रियकराने थेट मामुर्डी येथील लोखंडी मोबाइल टॉवर गाठला. दुपारी साडेतीनच्या सुमारास तो टॉवरवर चढला आणि सुमारे शंभर फूट उंचीवर जाऊन बसला. काही वेळातच ही वार्ता वार्‍यासारखी पसरली. टॉवरखाली परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली.

घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिसांचे पथक आणि अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. खबरदारी म्हणून रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आली. प्रियकराला खाली उतरविण्यासाठी पोलिसांनी त्याची प्रेयसी, गावाकडील नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींची मदत घेतली. मोबाइलवरून त्याच्याशी सातत्याने संवाद साधत समजूत काढण्यात आली.

मात्र, त्याला खाली उतरविण्यासाठी सर्वांची चांगलीच दमझाक झाली. तो काही केल्या कोणाचेही ऐकायला तयार नव्हता. अखेर प्रेयसीला हातात हार घेऊन लग्नास होकार द्यायला लावण्यात आला. त्यानंतर त्याचे मन वळले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या मोठ्या क्रेनच्या सहाय्याने सायंकाळी सव्वासातच्या सुमारास त्याला सुखरूप खाली उतरविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.