पिंपरी-चिंचवडमध्ये विवाहित महिलेने प्रियकराने केलेल्या मारहाणीनंतर गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्रियकराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयत महिलेच्या पतीने देहूरोड पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रियकरासह महिला आणि तरूणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी प्रसाद गायकवाड, रितेश भालेराव यांना देहूरोड पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. तर, यांच्यासह महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप महिला फरार आहे. या गंभीर घटने प्रकरणी मयत महिलेच्या ४० वर्षीय पतीने देहूरोड पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत २६ वर्षीय महिलेचे आणि मुख्य आरोपी प्रसाद गायकवाड यांचे अनेक महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी याची कुणकुण महिलेच्या पतीला लागली होती. दरम्यान, पतीने महिलेची समजूत काढली आणि अशा प्रकरणात पडू नकोस असे बजावले. महिलेने देखील पुन्हा असे प्रकरण कानावर येणार नाही असे वचन पतीला दिले. मयत महिला प्रियकर प्रसादला समजावण्याचा प्रयत्न करत होती. परंतु, प्रियकर प्रसाद हा समजून घेत नव्हता. त्याला महिलेसोबत प्रेमसंबंध ठेवण्यास आग्रही होता. हाच वाद टोकाला गेला आणि प्रसादने मयत प्रेयसीला मित्र आणि महिलेच्या मदतीने मारहाण केली. तसेच अश्लील शिवीगाळ केल्याने मयत प्रेयसी दुखावली गेली होती. याच कारणावरून २६ वर्षीय महिलेने घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. महिलेला दोन मुलं आहेत. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रियकर आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक गोवले हे करत आहेत.