पिंपरी : ‘भाजप एक कुटुंब असून सर्वांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. सभागृहात बाेलायची संधी देताे. त्यानंतरही मध्येच काेणी उठतो, बाेलतो, सहा महिने हे पाहतोय, आता माझी सहनशिलता संपली आहे. मी आता काेणाचेच ऐकणार नाही. गाेंधळ घातल्यास थेट निलंबित केले जाईल,’असा इशारा महापाैर रवी लांडगे यांनी भाजप नगरसेवकांना दिला. महापाैरांच्या आक्रमक पवित्र्यानंतर सर्व नगरसेवकांमध्ये शांतता पसरली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची ऑगस्ट महिन्याची सर्वसाधारण सभा तहकूब करावी लागल्यानंतर सप्टेंबर महिन्याची सभा बुधवारी आयाेजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवकांची मंगळवारी महापालिकेत बैठक झाली. या बैठकीत महापाैरांनी आक्रमक भूमिका घेत स्वपक्षाच्या नगरसेवकांना खडेबाेल सुनावले. सभा कामकाज, सभागृहाची प्रतिष्ठा, नगरसेवकांमधील समन्वय, विषयांवरील चर्चा आणि सभागृहातील शिस्त याबाबत बैठकीत चर्चा झाली.

सभागृहात वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप, आक्षेपार्ह भाषा, घोषणाबाजी, गोंधळ, महापौरांच्या आदेशाचे उल्लंघन, सभागृहाच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचेल असे वर्तन खपवून घेतले जाणार नाही. सभागृहातील शिस्तीचे उल्लंघन झाल्यास नगरसेवकाविरुद्ध कारवाईचाही इशारा देण्यात आला. ‘प्रत्येकाने सभागृहाची प्रतिष्ठा राखावी. कोणत्याही विषयावर बोलण्यासाठी सदस्यांनी हातवर करून परवानगी घ्यावी. बोलण्याची संधी मिळाल्यानंतरच मत मांडावे. एकाच वेळी अनेकांनी बोलणे, जागेवरून विनापरवानगी बोलणे, इतरांच्या भाषणात अडथळा आणणे अथवा सभेच्या कामकाजात व्यत्यय निर्माण करणे टाळावे. चर्चेदरम्यान संबंधित विषयापुरतेच बोलावे आणि विषयाशी संबंध नसलेले अवांतर वक्तव्य टाळावे,’ अशा सूचना महापौर लांडगे यांनी नगरसेवकांना दिल्या.

ऐनवेळची उपसूचना स्वीकारण्यास नकार

‘विषयांवर उपसूचना मांडावयाची असल्यास ती सभेच्या एक दिवस अगोदर लेखी स्वरूपात सादर करावी. त्यामुळे संबंधित उपसूचना मूळ प्रस्तावाशी सुसंगत आहे का, याबाबत प्रशासकीय बाबी तपासून सभागृहापुढे मांडता येतील. ऐनवेळी सादर करण्यात येणाऱ्या उपसूचना स्वीकारल्या जाणार नाहीत,’ असेही बैठकीमध्ये स्पष्ट करण्यात आले.

‘राष्ट्रवादी’च्या आराेपांना प्रशासन उत्तर देणार

तहकूब सभेतील विषय सर्वसाधारण सभेत घेतल्याने राष्ट्रवादी काॅंग्रेसने (अजित पवार) महापाैरांसह आयुक्तांना नाेटीस बजाविली आहे. परंतु, सभा घेण्याचा महापाैरांचा अधिकार आहे. प्रशासनाशी चर्चा करूनच सभा नियाेजित केली आहे. त्यामुळे ‘राष्ट्रवादी’कडून होणाऱ्या आराेपांना भाजपच्या काेणीही उत्तर द्यायचे नाही. प्रशासन त्यांना उत्तर देईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत गुरुवारी बैठक

शहर भाजपच्या काेअर कमिटीची नव्याने रचना करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये गुरूवारी (३ सप्टेंबर) या नवीन कमिटीची बैठक हाेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.