पिंपरी : खड्डा आणि चिखलामुळे दुचाकी घसरून टेम्पोच्या चाकाखाली सापडल्याने दहा वर्षीय मुलाचा मृत्यु झाल्याची घटना सोमवारी नांदे-म्हाळुंगे रोडवरील गोदरेज ग्रीन कोव्ह सोसायटीसमोर घडली. दुचाकीवरून मुलांना शिकवणी वर्गाला सोडविण्यासाठी जात असताना झालेल्या या अपघातात वडील आणि लहान बहीण जखमी झाले.

रिषभ संदीप पाटोळे (वय १०) असे अपघातात मृत्यू झालेल्या दहा वर्षीय चिमुरड्याचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप नारायण पाटोळे (वय ३८, रा. राजयोग सोसायटी, माण, हिंजवडी) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप हे सोमवारी सायंकाळी दुचाकीवरून मुलगा रिषभ आणि मुलगी स्वरा यांना म्हाळुंगे येथे शिकवणी वर्गाला सोडविण्यास जात होते. नांदे-म्हाळुंगे रस्त्यावरून जात असताना रस्त्यावरील खड्डा आणि चिखलामुळे दुचाकी घसरली. यात दुचाकीवरील तिघेही खाली पडले. याचवेळी पाठीमागून भरधाव आलेल्या टेम्पोच्या चाकाखाली रिषभ सापडला. यात त्याचा मृत्यू झाला. तसेच, संदीप आणि मुलगी स्वरा हे दोघे जखमी झाले. अपघातानंतर टेम्पोचालक वाहनासहित पसार झाला. टेम्पो चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावधन पोलीस तपास करीत आहेत.