पिंपरी : पिंपरी येथील मिलिटरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाण पुलाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते गुरूवारी करण्यात आले. यामुळे पिंपरीगाव, पिंपरी मार्केट, पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरात ये-जा करणे सुलभ झाले आहे. तसेच, संत तुकारामनगर येथीलल क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते झाले.
महापौर रवी लांडगे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, उपमहापौर शर्मिला बाबर, माजी महापौर योगेश बहल, आयुक्त विजय सूर्यवंशी, नगरसेवक संदीप वाघेरे, जितेंद्र ननावरे, नगरसेविका मनीषा लांडे, वर्षा जगताप, निकिता कदम, प्रियांका कुदळे, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यावेळी उपस्थित होते.
या उड्डाण पुलामुळे पुणे-मुंबई जुन्या महामार्गाजवळील रेल्वे फाटक बंद होणार आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणार्या वाहनचालकांना रेल्वे फाटक बंद असताना थांबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही. दापोडी-निगडी रस्त्याकडून पिंपरी गाव व पिंपरी मार्केटकडे जाणार्या नागरिकांना आता विनाथांबा प्रवास करता येणार आहे. प्रवासाचा वेळ व इंधनाची बचत होणार आहे.
पिंपरी, पिंपळे सौदागर व रहाटणी परिसरातील नागरिकांना दापोडी-निगडी समतल विलगकामध्ये (ग्रेडसेपरेटर) मार्गावर पोहोचण्यासाठी हा मार्ग अधिक सोयीचा व जवळचा पर्याय ठरणार आहे. यामुळे परिसरातील अंतर्गत वाहतूक अधिक सुलभ होण्यास मदत होईल. शगुन चौकमार्गे इंदिरा गांधी उड्डाण पुलावरून दापोडी-निगडी रस्त्याकडे जाणार्या वाहनांची वर्दळ कमी होण्यास मदत होणार आहे. त्या भागातील नागरिकांना संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनपर्यंत जलदगतीने पोहोचण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.
पिंपरी पुलावरील ताण कमी होणार
शहरातील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करताना केवळ सध्याच्या गरजांचा विचार न करता भविष्यातील वाढती वाहतूक कोंडी व शहराचा विस्तार लक्षात घेऊन पायाभूत सुविधा विकसित करणे आवश्यक आहे. रेल्वे उड्डाण पुलाची रचना, पोहोच रस्ते व सेवा रस्त्यांचे नियोजन करताना वाहनचालकांसह पादचार्यांच्या सुविधांचाही विचार करण्यात आला आहे. या पुलामुळे शगुन चौक, साई चौक येथील वाहतुक कोंडी तसेच, पिंपरी पुलावरील ताण कमी होणार आहे, असे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
पुलाच्या बांधकामांवर ६५ कोटींचा खर्च
उड्डाण पुलाच्या बांधकमासाठी एकूण ६५ कोटी २८ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. पुलाची एकूण लांबी ५६५ मीटर आणि रुंदी १७.२ मीटर आहे. रेल्वे स्पॅन वगळता व्हायाडक्टची लांबी २४० मीटर असून, त्याची रुंदी १७.२ मीटर आहे. पादचार्यांच्या सोयीसाठी पदपथाची व्यवस्था आहे. दापोडी-निगडी रस्त्याकडील पोहोच रस्त्याची लांबी १३५ मीटर, तर रुंदी १७.२ मीटर आहे. पिंपरी बाजूकडील पोहोच रस्त्याची लांबी १४५ मीटर आणि रुंदी १७.२ मीटर आहे. दापोडी-निगडी रस्त्याकडील पुलाच्या पोहोच रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या रेल्वे ट्रॅकपर्यंतच्या सर्व्हिस रोडची लांबी २८५ मीटर व रुंदी ९.४ मीटर आहे. पिंपरी बाजूकडील पुलाचा पोहोच रस्ता ते पॉवर हाऊस चौक (विणा सर्कल) पर्यंतच्या रस्त्याची लांबी ७१५ मीटर व रुंदी १८ मीटर आहे. पुलासाठी संरक्षण विभागाकडून एकूण ५.९६ एकर जागा जुलै २०२२ मध्ये महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून बांधकामास सुरूवात करण्यात आली होती.
