पिंपरी : मोशी कचरा डेपोतील कचऱ्याचा डोंगर पडून इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेला ५५ तास उलटल्यानंतरही शुक्रवारी प्रशासनाचे बचावकार्य सुरू होते; मात्र इमारतीखाली अडकलेल्या कामगारांच्या नातेवाईकांचा सहनशीलतेचा बांध अखेर फुटला. प्रशासनाकडून बचावकार्य अतिशय संथ गतीने सुरू असल्याचा संताप नातेवाईकांनी व्यक्त केला. नातेवाईकांनी घटनास्थळी आक्रोश केला. ‘आमचा माणूस आम्हाला पाहू द्या,’ अशी आर्त साद त्यांनी प्रशासनाला घातली.
दुर्घटनेत अद्यापही आठ जण कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यामध्ये महेश कुंभार, सनी माने, राहुल गायकवाड, सुनील कोरके, अक्षय सावंत, रणजित पाटील, नागेश गायकवाड आणि वामन कसबे यांचा समावेश आहे. या सर्वांचा शोध घेऊन त्यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यासाठी बचाव पथकातील जवानांकडून गेले तीन दिवस प्रयत्न सुरू आहेत. कचरा डेपोच्या प्रवेशद्वारावर नातेवाईकांची गर्दी असून, प्रत्येक सेकंदाला त्यांच्या चेहऱ्यावरील भीती आणि चिंता वाढत आहे. आतून बाहेर येणाऱ्या प्रत्येक शासकीय मोटारीकडे नातेवाईक धावत जात होते.
‘तीन दिवसांपासून कचऱ्याचा डोंगर तसाच आहे. जराही कमी झालेला नाही. शेवटचा व्यक्ती सापडल्यानंतर गेल्या ३३ तासांत एकही माणूस प्रशासनाने शोधून बाहेर काढलेला नाही. प्रशासनाकडून केवळ काम सुरू असल्याचे सांगितले जाते,’ असा संताप नातेवाईकांनी व्यक्त केला.
महापौर, आयुक्तांकडून नातेवाईकांना धीर
महापौर रवी लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना धीर दिला. ‘या कठीण प्रसंगी प्रशासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. इमारतीत अडकलेल्या व्यक्तींना सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी यंत्रणांचे अविरत प्रयत्न सुरू आहेत. बचावकार्य पूर्ण होईपर्यंत धीर धरा, यामध्ये निश्चितपणे अडकलेल्या व्यक्ती सुखरुपपणे बाहेर येतील,’ असा दिलासा नातेवाईकांना त्यांनी दिला.
विरोधी पक्ष जिवंत आहे का?
माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनीही दुर्घटनास्थळी भेट दिली. ‘कचरा डेपो परिसरात इमारत उभारता येत नाही. या दुर्घटनेत ठेकेदार दोषी आहे. राज्यासह शहरात विरोधी पक्ष जिवंत आहे का,’ असा सवालही त्यांनी केला.
