पिंपरी : मोशी येथील कचरा डेपोमध्ये कचऱ्याचा डोंगर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या इमारतीवर कोसळून नऊ कामगारांचा मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. एसआयटीमार्फत दुर्घटनेमागील कारणे, संबंधितांची जबाबदारी आणि सुरक्षेतील त्रुटींचा सर्वंकष तपास केला जाणार आहे.

मोशी कचरा डेपोमध्ये आठ जुलै रोजी कचऱ्याचा डोंगर वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळला होता. या दुर्घटनेत नऊ कामगारांचा मृत्यू तर, आठ जण जखमी झाले होते. बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, भारतीय सैन्य, अग्निशमन दल आणि महापालिका प्रशासनाने चार दिवस प्रयत्न केले होते. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी अँटोनी लारा रेन्यूएबल कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. तसेच, राज्य शासनाकडून विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली असून, त्यांच्याकडून या दुर्घटनेची स्वतंत्र चौकशी सुरू आहे.

दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तपास अधिक प्रभावी आणि सर्वंकष पद्धतीने करण्यासाठी पोलिसांकडून एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. या एसआयटीचे प्रमुख पोलीस उपायुक्त असून, दोन सहायक पोलीस आयुक्त, एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक व एक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, एक सहायक पोलीस निरीक्षक, एक फौजदार आणि चार पोलीस अंमलदार यांचा या पथकात समावेश आहे.

एसआयटीकडून कचऱ्याचा ढिगारा कोसळण्यामागील तांत्रिक कारणे, सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का, धोक्याची पूर्वकल्पना असूनही आवश्यक उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत, तसेच महापालिका प्रशासन, संबंधित कंपनी आणि इतर जबाबदार घटकांची भूमिका याची सखोल चौकशी केली जाणार आहे. तपासादरम्यान आवश्यक कागदपत्रे, तज्ज्ञांचे अहवाल आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे जबाबही नोंदविले जाणार आहेत.

मोशी कचरा डेपो दुर्घटनेचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापन करण्यात आली आहे. एसआयटीकडून दुर्घटनेची सखोल चौकशी सुरू असल्याचे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त मारुती जगताप यांनी सांगितले.