पिंपरी : ‘मोशी कचरा डेपोतील कचऱ्याचे डोंगर संपविण्यासाठी ‘बायोमायनिंग’ला गती दिली आहे. दरराेज पाच हजार टन कचऱ्याचे ‘बायाेमायनिंग’ केले जात आहे. संबंधित ठेकेदाराला मनुष्यबळ, यंत्रसामग्री वाढवून सहा महिन्यांत डाेंगर कमी करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. त्यासाठी पावसाळ्यातही ‘बायोमायनिंग’चे काम सुरू असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
मोशीतील ८१ एकर जागेवर १९९१ पासून शहरातील कचरा टाकला जात आहे. वैज्ञानिक म्हणजेच ‘बायोमायनिंग’ पद्धतीने जुना कचरा नष्ट करून जमीन वापरासाठी उपलब्ध करण्याचे काम सन २०२३ पासून सुरू आहे. मात्र, आतापर्यंत जुन्या निम्म्याच कचऱ्याचे ‘बायोमायनिंग’ झाले आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. सूर्यवंशी म्हणाले, ‘कचऱ्याचे बायोमायनिंग करणाऱ्या ठेकेदाराची मुदत संपली आहे. आतापर्यंत संपूर्ण कचऱ्याचे ‘बायाेमायनिंग’ करून डाेंगर हटणे अपेक्षित हाेते. परंतु, कचऱ्याचा डाेंगर कमी झाला नाही. त्यामुळे ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात आली आहे. मनुष्यबळ, यंत्रसामग्री वाढविण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीमध्ये सहा महिन्यांत डाेंगर कमी करण्याचे उद्दिष्ट ठेकेदाराला दिले आहे.’
‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प बंद
डेपोवर कचरा टाकण्यास सुरुवात झाली आहे. ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पातील चिमणीचे काम महिनाभरात पूर्ण हाेईल. सप्टेंबरच्या मध्यात प्रकल्प सुरू होईल. प्रकल्प बंद असल्याने सद्य:स्थितीत कचऱ्यावर प्रक्रिया हाेत नाही. कचरा वर्गीकरण करून ठेवला जात असल्याचे डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
प्रक्रिया प्रकल्पासाठी कटक मंडळाची जागा
शहरातील दहाही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे नियाेजन आहे. त्यासाठी ४० जागांची निश्चिती केली आहे. यामधील कमी लाेकवस्तीमधील जागा निवडण्यात येणार आहेत. खडकी कटक मंडळाच्या कासारवाडीतील ४० एकरपैकी निम्मी जागा घेतली जाणार आहे. जागा न दिल्यास कटक मंडळाचा दररोजचा २५ टन कचरा स्वीकारणे बंद करणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
‘बायोसीएनजी’चे सहा प्रकल्प
शहरात दैनंदिन १५०० टन कचरा निर्माण होतो. त्यांपैकी ७०० टन कचऱ्यापासून वीजनिर्मिती केली जाते. ८०० टन कचरा साचवून ठेवला जातो. भविष्यात पाच हजार टन कचरा निर्माण हाेऊ शकताे. त्यांपैकी तीन हजार टन ओला कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ५०० टन क्षमतेचे सहा बायाेसीएनजी प्रकल्प उभारले जाणार आहेत. यातून संपूर्ण ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया हाेईल. दाेन हजार टन सुक्या कचऱ्यापासून ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या माध्यमातून वीजनिर्मिती केली जाईल. अनेक कंपन्यांकडून सुक्या कचऱ्याची मागणी केली जात असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
भविष्यात कचऱ्याचे डोंगर होऊ दिले जाणार नाहीत. प्रक्रिया करून कचऱ्याची विल्हेवाट लावली जाईल. ‘वेस्ट टू एनर्जी’चा एक हजार टनांचा नवीन प्रकल्प सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. माेशी कचरा डेपाेत जागा शिल्लक नाही. नवीन ठिकाणी हा प्रकल्प सुरू केला जाईल, असे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
