पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोतील सुक्या कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा (वेस्ट टू एनर्जी) प्रकल्प धुराड्याची चिमणी पडल्यामुळे चार महिन्यांपासून बंद असल्याने डेपोत कचऱ्याचे डोंगर वाढले आहेत. चिमणी उभारण्यास विलंब होत असल्याने ठेकेदाराला ऑक्टोबरपासून प्रतिदिन ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यास पर्यावरण विभागाने सुरुवात केली आहे.
महापालिकेच्या ८१ एकर जागेतील मोशी कचरा डेपोत अँटोनी लारा रेन्यूएबल एनर्जी प्रा. लि. या ठेकेदारामार्फत ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प डीबीओटी तत्त्वावर जुलै २०२३ पासून सुरू आहे. दररोज सातशे टन सुका कचरा जाळून १४ मेगा वॅट वीज तयार केली जात हाेती. जाळल्या जाणाऱ्या कचऱ्यातून धूर निर्माण होऊन होणाऱ्या वायुप्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकल्पाला नोटीस बजावली होती. त्यातच पाच जून २०२६ राेजी प्रकल्पातील धुराड्याची चिमणी पडली. त्यामुळे चार महिन्यांपासून प्रकल्प बंद आहे. त्यानंतर आठ जुलैला कंपनीची प्रशासकीय इमारत कोसळून नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून शहरातील कचऱ्याची संपूर्ण यंत्रणा ढासळली आहे. डेपाेची क्षमता संपल्यामुळे शहरात कचरा काेंडी निर्माण झाली असून परिस्थिती अद्याप पूर्वपदावर आली नाही.
मुदतीत प्रकल्प सुरू करण्यात अपयश
‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी संबंधित ठेकेदाराला दिले होते. ठेकेदाराने ३० सप्टेंबरपर्यंत चिमणीचे काम पूर्ण करून एक ऑक्टोबरपासून प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाला दिले. परंतु, सप्टेंबरपर्यंत ठेकेदाराला चिमणीचे कामकाज पूर्ण करता आले नाही. हा प्रकल्प बंद असल्याने डेपोत कचरा टाकण्यास जागा मिळत नाही. त्यामुळे कचरा संकलनावर परिणाम झाला आहे. लोकप्रतिनिधींकडून कचरा समस्या तातडीने साेडवण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पाच्या ठेकेदाराला एक ऑक्टोबरपासून प्रतिदिन ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. ठेकेदाराला हा प्रकल्प सुरू करण्यास आणखी पंधरा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
प्रकल्पाच्या क्षमतेत वाढ नाही
शहरातून गोळा होणाऱ्या कचऱ्याचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन २१ वर्षे कालावधीमध्ये आवश्यकतेनुसार प्रकल्पाची क्षमता वाढवण्याची जबाबदारी ठेकेदार कंपनीवर आहे. तसा स्पष्ट उल्लेख महापालिका आणि ठेकेदार यांच्यातील करारनाम्यात आहे. परंतु, गेल्या तीन वर्षांत ठेकेदार कंपनीने १४ मेगा वॅटपेक्षा अधिक वीजनिर्मिती केली जात नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बायोसीएनजीचे सहा प्रकल्प
शहरात दैनंदिन १५०० टन कचरा निर्माण हाेताे. त्यापैकी ७०० टन कचऱ्यातून वीजनिर्मिती केली जाते. ८०० टन कचरा साचून ठेवला जाताे. भविष्यात पाच हजार टन कचरा निर्माण हाेऊ शकताे. त्यांपैकी तीन हजार ओला कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ५०० टन क्षमतेचे सहा बायाेसीएनजी प्रकल्प उभारले जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले
कोट
‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पातील चिमणी सुरू करण्याबाबत संबंधित ठेकेदाराने सप्टेंबरअखेरपर्यंत मुदत मागितली हाेती. मात्र, या मुदतीत प्रकल्प सुरू करण्यास ठेकेदाराला अपयश आले आहे. त्यामुळे संबंधित कंपनीला प्रतिदिन ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यास सुरुवात केली असल्याचे पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता विनय ओहोळ यांनी सांगितले.
