पिंपरी : पर्यावरण संवर्धन, हवामान बदल नियंत्रण आणि हरित जीवनशैलीचा प्रसार या उद्देशाने राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘माझी वसुंधरा’ या उपक्रमात ‘हरित प्रतिज्ञा’ घेऊन सहभागी व्हावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेने केले आहे. यासाठी मोहिमेंतर्गत वृक्षारोपण करताना किंवा हरित उपक्रमात सहभागी होताना एक छायाचित्र काढावे, ते समाजमाध्यमावर प्रसारित करावे. तसेच, महापालिकेच्या अधिकृत समाजमाध्यमातील पेजला ‘टॅग’ करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांमध्ये वसुंधरा संवर्धन, हरित सवयी आणि जबाबदार नागरी सहभाग वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. तसेच, ‘माझी वसुंधरा’ मोहिमेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधून विशेष कार्ययोजना आखण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये, उद्योगसंस्था, महिला बचत गट, रहिवासी संघटना आणि सामाजिक संस्था यांनाही या उपक्रमात सहभागी होण्यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून प्रोत्साहित केले जात आहे.
आता या मोहिमेचा भाग म्हणून शहरातील नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने ‘हरित प्रतिज्ञा’ घेऊन पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संकल्प करून आपल्या कृतीतून निसर्गसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
अशी घेता येईल प्रतिज्ञा
सर्वप्रथम https://majhivasundhara.in या संकेतस्थळावर जाऊन मराठी, इंग्रजी यापैकी मराठी भाषा निवडावी. ‘हरित शपथ’ हा पर्याय क्लिक करावा लागेल, ‘त्वरित तुमची ई-प्लेज घ्या’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर ‘पुढे जा’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ‘वैयक्तिक, सामूहिक’ यापैकी एक पर्याय निवडून ‘सादर करा’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर प्रतिज्ञा अर्ज भरून ‘सादर करा’ या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
शहराने ‘हरित जीवनशैली’ अंगीकारण्यासाठी पुढाकार घेतला असून ‘माझी वसुंधरा ६.०’ अभियानामुळे नागरिकांना पर्यावरणपूरक विचार आणि कृतींचे प्रात्यक्षिक देण्याची उत्तम संधी मिळते. महापालिका प्रशासन, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि नागरिक सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास शहर राज्यातील आदर्श, सुंदर, हरित शहर ठरू शकेल, असा विश्वास पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी व्यक्त केला आहे.
