पिंपरी : पर्यावरणपूरक उपाययोजना करणाऱ्या गृहप्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘ग्रीन सोसायटी’ हा उपक्रम सुरू केला आहे. स्थानिक पातळीवर उपाययोजना राबवून नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
या उपक्रमांतर्गत ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण करणे, सोसायटीमध्ये सेंद्रिय कचऱ्याचे कंपोस्टिंग करणे, सौरऊर्जेचा वापर करणे, पावसाचे पाणी साठवणे (रेन वॉटर हॉर्वेस्टिंग), आणि सांडपाण्याचे शुद्धीकरण व पुनर्वापर यंत्रणा बसविणे याचा समावेश होतो. प्रत्येक निकष पूर्ण केल्यावर सोसायटीला एक हरित तारांकित मानांकन (स्टार रेटिंग) दिले जाणार आहे. सर्व निकष पूर्ण करणाऱ्या सोसायट्यांचा महापालिकेच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे.
आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार म्हणाले, ‘ग्रीन सोसायटी या उपक्रमामुळे फक्त इच्छाशक्ती नव्हे, तर कृती घडवून आणणारी दिशा गृहप्रकल्पांना मिळणार आहे. पिंपरी-चिंचवडकरांना शाश्वत शहर जीवनशैलीकडे वाटचाल करण्यासाठीदेखील यामुळे प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास आहे. ‘ग्रीन सोसायटी’ उपक्रम ही केवळ शासकीय योजना नसून, लोकांच्या सहभागातून पर्यावरण जागरूकतेची संस्कृती निर्माण करण्याची चळवळ ठरणार आहे.’