पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. लक्ष्मण गोफणे यांना बढती देण्यात आली. डॉ. अभयचंद्र दादेवार यांच्याकडे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे.
महापालिकेचे रिक्त असलेले आरोग्य वैद्यकीय अधिकारी रिक्त पद भरण्यासाठी १९ मे २०२३ रोजी पदोन्नती समितीची बैठक झाली. शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी, सेवा ज्येष्ठतेनुसार सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांना आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी बढती देण्याची शिफारस समितीने केली. याबाबतच्या प्रस्तावाला महासभेने मान्यता दिली. डॉ. गोफणे यांच्या आस्थापना विषयक बाबी वैद्यकीय मुख्य कार्यालयाकडेच राहणार आहेत.




महापालिका आस्थापनेवरील अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी हे पद रिक्त आहे. वैद्यकीय विषयक कामकाजाच्या सोईच्या दृष्टीने ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांच्याकडे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी या पदाचा पदभार देण्यात आला आहे. याबाबतचे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी काढले.