पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या पुणे-बंगळुरू (देहूरोड-कात्रज) बाह्यवळण महामार्गाला जोडून असलेल्या रावेत, किवळे हद्दीतील सेवा रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. याबाबत महापालिकेकडे तक्रारी येत आहेत. हे खड्डे तातडीने बुजवावेत. तसेच बंद असलेले सात नळकांडी (पाईप कल्व्हर्ट) पुलाची दुरुस्ती करण्याचे पत्र पिंपरी-चिंचवड महापालिकेने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहे.
पुणे-बंगळुरू महामार्ग पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून जातो. महामार्गालगत असलेल्या किवळे, रावेत, वाकड, पुनावळे, ताथवडे येथील सेवा रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सेवा रस्त्यावर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आखत्यारित असलेल्या दहा नळकांडी पुलांपैकी केवळ दोन पूल नैसर्गिक नाल्यावर आहेत. बाकीचे पूल जागेच्या समानतेनुसार केले आहेत. तेथे नैसर्गिक नाला असल्याची विकास आराखड्यात कोठेही नोंद नाही. सात पूल मातीने भरले आहेत. त्यामुळे महामार्गाच्या पश्चिमेकडील बाजूकडील पाणी पूर्वेकडे वाहून जात नाही. परिणामी, पाणी साचून राहते. त्यासाठी पूल साफ करावेत. त्यानंतर पाणी साचणार नाही. सेवा रस्त्यावर पावसाळी पाण्याची वाहिनी नाही. त्यामुळे पावसाचे पाणी नाल्यापर्यंत जात नाही. सेवा रस्त्यांच्या बाजूस पावसाळी पाण्याची वाहिनी टाकावी. नैसर्गिक नाल्यात पाणी सोडावे. बंद असलेल्या सात नळकांडी पुलाची दुरुस्ती करावी. सेवा रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडतात. गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्यावर खड्डे तयार झाले आहेत. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. त्यामुळे महापालिकेकडे बऱ्याच तक्रारी येत आहेत. हे खड्डे बुजवावेत, असे पत्र महापालिकेने प्राधिकरणाला दिले आहे.
खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीत भर
सेवा रस्त्यावर पडलेले खड्डे, साचणारे पावसाचे पाणी व वाहतूक कोंडीमुळे वाकड, ताथवडे, पुनावळे येथील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सेवा रस्त्यावर पावसाचे पाणी साचते. वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते.
सेवा रस्त्याबाबत दहा वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. महापालिकेने सेवा रस्त्याचा विकास करण्याची तयारी दर्शविल्यानंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आम्ही सेवा रस्ता करतो, अशी भूमिका घेतली. आता प्राधिकरणाने सेवा रस्ता लवकर पूर्ण करावा. रस्ता पूर्ण करणे होत नसेल तर ठेकेदाराकडून रस्त्यावरील खड्डे बुजवून घ्यावेत.- राहुल कलाटे, माजी नगरसेवक
महामार्गाला जोडून असलेल्या रावेत, किवळे हद्दीतील सेवा रस्त्यावरील नळकांडी पुलाची दुरुस्ती करावी. रस्त्यावरील खड्डे बुजवावेत. पावसाळी पाण्याची वाहिनी टाकण्याबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्राद्वारे कळविले आहे.- देवन्ना गट्टूवार, सहशहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका