लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी महापालिकेच्या काही इमारती भाडेतत्त्वावर दिलेल्या आहेत. या इमारतींच्या भाड्यापोटी पोलीस आयुक्तालयाकडून महापालिकेला साडेपाच कोटी रुपये भाडे येणे आहे. वर्षानुवर्षे भाडे भरले नसल्याने मोठी थकबाकी राहिली आहे.
पुणे शहर व ग्रामीण हद्दीतील पोलीस ठाणे मिळून नव्याने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. १५ ऑगस्ट २०१८ पासून नवीन आयुक्तालयाचे कामकाज सुरू झाले. चिंचवडमधील प्रेमलोक पार्क येथील महापालिकेच्या महात्मा फुले शाळेची इमारत पोलीस आयुक्तालयासाठी देण्यात आली. १ जानेवारी २०१९ पासून प्रेमलोक पार्क येथील नवीन इमारतीतून पोलीस आयुक्तालयाचे कामकाज सुरू झाले.
स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी विविध कामकाजासाठी महापालिकेच्या इमारती भाडेतत्त्वावर देण्याबाबतची मागणी केली. त्यानुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ तीनच्या कार्यालयासाठी चिंचवड स्टेशन येथील प्रीमिअर प्लाझा येथील दोन मजली इमारत दिली आहे. तसेच सांगवीतील भाजी मंडईसाठी विकसित केलेले गाळे सांगवी पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी देण्यात आले.
आणखी वाचा- प्रियकराशी भेट घडविण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची मध्यप्रदेशात ५० हजारांत विक्री
यासह पिंपरीतील मेघाजी लोखंडे कामगार भवन, मोहननगर येथील बहुउद्देशीय इमारत, पिंपळे गुरव उद्यानातील क्वॉटर्स, दिघी, वडमुखवाडी येथील जागाही पोलिसांच्या वाहतूक विभाग, गुन्हे युनिट शाखा या विविध विभागासाठी भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. मुख्यालयासाठी निगडी येथील कै. अंकुश बोऱ्हाडे शाळेची इमारत, तसेच मोकळी जागाही दिली आहे. थेरगाव पोलीस चौकीसाठी महिला विकास केंद्राची इमारत, गुन्हे शाखा युनिट दोनसाठी यमुनानगर येथील अहल्यादेवी होळकर व्यायामशाळा अशा विविध इमारती दिल्या आहेत.
दि. १५ ऑगस्ट २०१८ पासून अद्यापपर्यंत या इमारतींच्या भाड्यापोटी महापालिकेला पाच कोटी ६२ लाख रुपये थकबाकी येणे आहे. या थकबाकीची पूर्तता होण्याची महापालिकेला प्रतीक्षा आहे.
कार्यालयाचे नाव मासिक भाडे थकबाकी
सांगवी पोलीस ठाणे १८ हजार ९ लाख पोलीस उपायुक्त, परिमंडळ तीन २८ हजार १५ लाख प्रीमिअर प्लाझा, चिंचवड पिंपरी वाहतूक विभाग ११ हजार ६ लाख गुन्हे युनिट -३, मोहननगर, १२ हजार ३६५ १७ लाख
सांगवी पोलीस ठाणे, पिंपळे गुरव ३ हजार ४५२ १ लाख
पोलीस आयुक्तालय, प्रेमलोक पार्क, चिंचवड ३ लाख ८० हजार २ कोटी ३ लाख
दिघी पोलीस ठाणे, दिघी २ लाख २६ हजार १ कोटी २० लाख
पोलीस मुख्यालय, निगडी ६० लाख
वाहतूक शाखा, चापेकर चौक, २ लाख ३१ हजार १ कोटी
थेरगाव पोलीस चौकी ४३ हजार २३ लाख
गुन्हे शाखा युनिट २, यमुनानगर २७ हजार ७ लाख
गुन्हे शाखा युनिट ४, डांगे चौक २ हजार १ लाख
या थकबाकीसंदर्भात पोलीस विभागाशी संपर्क साधला आहे. अतिक्रमण कारवाईसाठी महापालिकेकडून पोलिसांचा बंदोबस्त घेतला जातो. त्यापोटी पोलिसांना पैसे दिले जातात. त्यातून थकबाकीची रक्कम वर्ग करून घेऊ का, अशी विचारणा पोलिसांना केली आहे. त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय होऊन थकबाकीची पूर्तता होईल. -प्रशांत जोशी, सहायक आयुक्त, भूमी व जिंदगी विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका