प्रसिद्ध कलावंतांचे, ‘सेलिब्रेटी’चे ग्लॅमर आणि त्यांचा ‘नट्टापट्टा’ सर्वाना दिसतो, मात्र त्यांचे खडतर आयुष्य व दैनंदिन जीवनातील त्रास दिसून येत नाही, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंचवड येथे बोलताना व्यक्त केले.

पिंपरी नाटय़परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त अजय पूरकर (बालगंधर्व पुरस्कार), दिगंबर नाईक (आचार्य अत्रे पुरस्कार), राहुल सोलापूरकर (अरुण सरनाईक पुरस्कार), शिरीष लाटकर (जयवंत दळवी पुरस्कार), अमृता सुभाष (स्मिता पाटील पुरस्कार) यांच्यासह रवींद्र कदम, पद्मजा कुलकर्णी, रवि पाटील, भाऊसाहेब सांगळे, सोनाली गायकवाड, चेतन चावडा, साधना जोशी (विशेष पुरस्कार) यांना पवारांच्या हस्ते गौरवण्यात आले, तेव्हा ते बोलत होते. नाटय़ परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, डॉ. पी. डी. पाटील, कृष्णकुमार गोयल, संजोग वाघेरे, आझम पानसरे, हनुमंत गावडे, योगेश बहल, मंगला कदम, डब्बू आसवानी आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, कलावंतांच्या आयुष्यातील झगमगाट आपल्याला दिसतो, मात्र प्रयोग अथवा शूटिंगसाठी रात्री-बेरात्री दूपर्यंत प्रवास करावा लागतो. जेवणाची गैरसोय होते. उशिरा रात्री थंड जेवण घ्यावे लागते. भाडेदर परवडत नाही. खूप कष्ट करावे लागतात. खूप काही सोसावे लागते, या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. या क्षेत्रात खूपच अनिश्चितता आहे. प्रेक्षक कधी डोक्यावर घेतील आणि कधी पाठ फिरवतील, याचा नेम नसतो. ‘सैराट’चे कलावंत पाच-सहा लाख रुपये मानधन घेतात. मात्र, जुन्या, जाणत्या कलावंतांना तितका लाभ मिळत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

‘पिंपरीत मोकळीक, पुण्यात अडथळे’

पिंपरीत मी निर्णय घेतो, तशी अंमलबजावणी होते. पुण्यात तसे होत नाही. प्रत्येक वेळी कोणाची तरी मदत घ्यावी लागते. जरा काही झाले की काही मंडळी न्यायालयात जातात, त्याचा परिणाम कामांवर होतो. विकास करताना काही वेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात, वाईटपणा घ्यावा लागतो, असे अजित पवार यांनी नमूद केले.