पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्गाचे काम सुरू असून, निगडी येथील टिळक चौकात नवे, चौथे मेट्रो स्थानक बांधण्यात येत आहे. या नव्या मेट्रो स्थानकासाठी २५ कोटी रुपयांचा खर्च वाढल्याने या मार्गासाठी महापालिकेचा हिस्सा १४६ कोटी ९७ लाख रुपयांचा झाला आहे. या मार्गाचे आतापर्यंत ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
शहरात दापोडी ते पिंपरी या मार्गावर मेट्रो धावत आहे.
पिंपरीपासून निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंत ४.४१३ किलोमीटर अंतराच्या मेट्रोच्या विस्तारित मार्गाचे काम सध्या सुरू आहे. यासाठी ९१० कोटी १८ लाख रुपये खर्चास केंद्राच्या गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने सन २०२३ मध्ये मंजुरी दिली. या प्रकल्पात चिंचवड स्टेशन, आकुर्डीतील खंडोबा माळ चौक आणि निगडीतील भक्ती शक्ती समूह शिल्प चौक अशी तीन मेट्रो स्थानके होती. नागरिकांची मागणी लक्षात घेऊन निगडी येथील टिळक चौकातील चौथ्या मेट्रो स्थानकाच्या वाढीव ५० कोटी रुपये खर्चाला दहा मार्च २०२६ ला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च वाढून ९६० कोटी १८ लाखांवर गेला आहे.
काम ५५ टक्के पूर्ण
आतापर्यंत या मार्गावरील ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे. महापालिका एकूण १४७ कोटी ९७ लाख रुपये महामेट्रोला देणार आहे. त्यापैकी ४९ कोटी रुपये २४ ऑक्टोबर २०२४ ला देण्यात आले आहेत. ‘महामेट्रो’ने ३५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. तसेच, टिळक चौकातील मेट्रो स्थानकासाठी २५ कोटी रुपये मागितले असून, एकूण ६० कोटी रुपये महामेट्रोला द्यायचे आहेत. महापालिकेने आतापर्यंत ९९ कोटी रुपये महामेट्रोला दिले आहेत. आणखी ४८ कोटी ९७ लाख रुपये ‘महामेट्रो’ला द्यावे लागणार असून, याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.
महापालिकेवर सर्वाधिक आर्थिक भार
पिंपरी ते निगडी मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकार ६७ कोटी दोन लाख आणि राज्य सरकार ७९ कोटी आठ लाख रुपये अनुदान देणार आहे. महापालिकेचा हिस्सा सर्वाधिक १२१ कोटी ९७ लाख रुपये इतका होता. उर्वरित ४०२ कोटी ११ लाखांचा निधी कर्जातून महामेट्रोकडून उभा केला जाणार आहे. तसेच, भूसंपादन, पुनर्वसन, पुनर्वसाहतीकरण आणि बांधकाम कालावधीतील व्याजाकरिता महापालिका १३७ कोटी ८७ लाख रुपये देणार आहे. चौथ्या मेट्रो स्थानकाचा खर्च निम्मा-निम्मा म्हणजे प्रत्येकी २५ कोटी रुपये राज्य सरकार व महापालिका करणार आहे. त्यामुळे या प्रकल्पात महापालिकेचा एकूण हिस्सा २८४ कोटी ७५ लाख रुपये इतका झाला आहे.
