पिंपरी : फुगेवाडी येथे गुरुवारी दिवसभरात पाच जणांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाल्याची चर्चापरिसरात वार्‍यासारखी पसरली आणि एकच खळबळ उडाली. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश असून एका भावाच्या मृत्यूचा धक्का बसल्याने दुसर्‍या भावाचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या वडिलांनी सांगितले आहे.

पांडुरंग सदाशिव फुगे (वय ५७), विजय प्रकाश राठोड (वय ३१), राजेंद्र प्रकाश राठोड (वय ३४), राजेंद्र राजपूत (वय ५१), अकबर पठाण (वय ५२) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी याबाबत माहिती दिली. फुगे यांचा नैसर्गिक मृत्यू झाला. त्यांना कोणत्याही रुग्णालयात दाखल केले नाही. त्यांच्यावर गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. विजय राठोड हे एका कंपनीत काम करत होते. बुधवारी ते विश्रांतवाडी येथे पॅकेजिंगच्या कामासाठी गेले होते. तिथे काम करत असताना त्यांना अचानक चक्कर आली. त्यामुळे त्यांच्या सहकार्‍यांनी खडकी कॅन्टोन्मेंट रूग्णालयात त्यांना दाखल केले. बुधवारी दिवसभर त्यांच्यासोबत त्यांचा सख्खा भाऊ राजेंद्र राठोड आणि वडील प्रकाश राठोड उपस्थित होते. रात्री दोघे घरी आले. सकाळी ते रूग्णालयात जाणार होते. मात्र, सकाळी साडेसात वाजता विजय यांचा मृत्यू झाल्याची माहिती राजेंद्र यांना समजली. भावाचा मृत्यू झाल्याचा धक्का त्यांना बसला आणि त्यांना फीट आली. तोंडातून फेस आला. त्यामुळे त्यांना औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथे साडेनऊ वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

राजेंद्र राजपूत हे गुरुवारी सकाळी घरातील स्वच्छतागृहात गेले. तिथे त्यांना चक्कर आली. त्यामुळे त्यांना वायसीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अकबर पठाण यांना मागील १५ वर्षांपासून मद्याचे व्यसन होते. बुधवारी ते मद्य प्यायले होते. गुरुवारी सकाळी त्यांना त्रास होत असल्याने वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. मात्र, एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाल्याने फुगेवाडीत खळबळ उडाली. मृत्यू नेमके कशामुळे झाले, काय कारण आहे, अशा चर्चांना उधाण आले होते.

दापोडी येथे एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाला. याबाबत काही अफवा पसरल्याने कसून चौकशी करण्यात आली. मृतांपैकी चार जणांचा ह्दयविकाराने, चक्कर आल्याने मृत्यू झाला आहे. एकाला मद्याचे व्यसन होते. त्याबाबत चौकशी सुरु असल्याचे सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांनी सांगितले.