पिंपरी : फुगेवाडीतील विषारी दारूकांडातील आरोपी गुरुमंगतसिंह कर्नेलसिंह विरका याने अनधिकृत बांधकाम केल्याचे महापालिकेच्या पाहणीत आढळून आले आहे. हे अनधिकृत बांधकाम स्वतःहून काढून टाकण्याबाबत महापालिकेने विरकाला नोटीस बजावली आहे. अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा, महापालिकेने दिला आहे.
फुगेवाडीतील संजयनगर झोपडपट्टीत विरका याने अनधिकृत बांधकाम केले आहे. महापालिकेने या बांधकाची पाहणी केली. हे बांधकाम अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे उपायुक्त अण्णा बोदडे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. २४ तासाच्या आत अनधिकृत बांधकाम रितसर परवानगी घेऊन केल्याचा लेखी पुरावा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अनधिकृत बांधकाम स्वतःहून काढून टाकावे. अन्यथा महापालिका बांधकाम पाडेल. पाडकामाचा खर्च वसूल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बेकायदेशीर दारूविक्री करणाऱ्यांवर पोलिसांचा मोठा छापा!
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पिंपरी, तळेगाव, भोसरी एमआयडीसी, दक्षिण महाळुंगे, दिघी, चिखली, आळंदी, चाकण, शिरगाव, रावेत आणि देहूरोड पोलीस स्टेशनच्या भागात पोलिसांनी विविध ठिकाणी धाडी टाकून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर दारूसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी २१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मंगळवारी (दि. २ जून) रोजी सकाळपासून ते रात्रीपर्यंत या कारवाया करण्यात आल्या. यात पोलिसांनी गावठी हातभट्टीची दारू, रसायन, देशी-विदेशी दारूच्या बाटल्या आणि वाहतुकीसाठी वापरलेली रिक्षा असा एकूण लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या प्रकरणी २१ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार दिनेश पुंडे (वय ३१, पिंपरी पो.ठाणे), निलेश जाधव (खंडणी विरोधी पथक), विनोद वीर (मालमत्ता गुन्हे विरोधी पथक), प्रदीप चौगुले, राजेंद्र खेडकर, सोमनाथ खळसोडे, नारायण सोमवंशी, विशाल बारवकर, संतोष भोर, हरीराम डुमनर, सुमित जगझाप, संतोष वायकर, रोशन डोंगरे, मनोज पांगरे, निखिल कपले, बाबासाहेब क्षीरसागर, शुभम बावणकर, शैलेश काळभोर आणि भाग्यश्री गायकवाड यांनी आपापल्या पोलीस ठाण्यात फिर्यादी दिल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना, बेकायदेशीररित्या मानवी शरीरास अपायकारक असणारी गावठी दारू व विविध नामांकित कंपन्यांची देशी-विदेशी दारू बाळगून ग्राहकांना विक्री करत असताना रंगेहात पकडले गेले. संबंधित परिसरातील पोलीस ठाणी या सर्व गुन्ह्यांचा पुढील तपास करत आहेत.
