पिंपरी : फुगेवाडी परिसरातील विषारी दारू प्रकरणात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि फौजदारासह चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, तपास पथकाचे (गुन्हे) प्रमुख फौजदार राजू भास्कर आणि कर्मचारी जयदीप सोनवणे, नवनाथ पोटे, सागर जाधव, विशाल काळे यांचा निलंबन करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे. मुंबई पोलीस (शिक्षा व अपील) नियम १९५६ आणि मुंबई पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत अधिकारांचा वापर करत तिघांनाही तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत ही कारवाई लागू राहणार आहे.

बारा जणांचा मृत्यू

पांडुरंग सखाराम फुगे (वय ५३), अकबर आजीमखान पठाण (वय ४८), राजेश शांताराम राजपूत (वय ५०), आनंद पांडेराव देसाई (वय ५३), आनंद काशीनाथ निकाळजे (वय ६४), कदीर अबदुल शहा (वय ४५), भिमाण्णा बसन्ना नागराल (वय२७), अक्षय अशोक अवसरमल (वय २८), सचिन रामचंद्र नेटके (वय ३६), सुरप्पा मनाप्पा बंगारी (वय ५५), राजेंद्र प्रकाश राठोड (वय ३४), विजय प्रकाश राठोड (वय ३१, सर्व रा. फुगेवाडी) अशी मृत्युमुखी पडलेल्या बारा जणांची नावे आहेत. श्रीमंत शिवपूत्र कोळी (वय ५२), प्रकाश उमाजी राठोड (वय६५), जितू मनोहर शेदातपुरी (वय ३१), चंदन रामबल्ली कुमार (वय २६) आणि सुभाष डिग्गीकर (वय ६६) या पाच जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर विविध रूग्णालयात अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत.

चक्कर, दम, श्वसनाचा त्रास

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी स्पिरिटसारखे रसायन वापरून दारू तयार केली होती. ती ३५ लिटरच्या १२ ड्रममध्ये भरून ठेवली. त्यापैकी एक ड्रम फुगेवाडी येथील कर्नेलसिंग आणि गुरमंगतसिंग यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या दारूची ते स्थानिक ग्राहकांना विक्री करीत होते. मृत व्यक्तींनी त्यांच्याकडून बुधवारी सायंकाळी दारू घेऊन ती प्राशन केली. त्यांना रात्री चक्कर येणे, दम लागणे, श्वसनाचा त्रास, अंधारी अशी लक्षणे दिसू लागली. त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान १२ जणांचा मृत्यू झाला.

मंडळाच्या फलकामुळे प्रकार उघडकीस

फुगेवाडीतील आझाद मित्र मंडळाच्या फलकावर मृत्यू झालेल्यांची माहिती देण्यात आली होती. त्या फलकाचे छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित झाले. एकाच दिवशी सात जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात त्याची चर्चा सुरू झाली. विषारी दारूमुळे या व्यक्तींचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला. त्यानुसार पोलिसांनी तपास केला आणि हा प्रकार उघडकीस आला.

सख्ख्या भावांचा मृत्यू, वडिलांची मृत्यूशी झुंज

मृत्यू झालेले राजेंद्र प्रकाश राठोड (वय ३४), विजय प्रकाश राठोड (वय ३१) सख्खे भाऊ आहेत. त्यांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. राठोड कुटुंब मुंबई येथून फुगेवाडी येथे काही वर्षांपूर्वी कामानिमित्त स्थायिक झाले. वडील प्रकाश यांनाही त्रास होऊ लागल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत.