पिंपरी : लक्झरी बसमधून अफू व शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून एकूण २८ लाखांचा मुद्देूमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई ४ फेब्रुवारी रोजी रावेत परिसरात करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी श्रवणलाल बहादुरराम देवासी (वय ३६, मुळ रा. पाली, राजस्थान; सध्या रा. पुणे) याला अटक करण्यात आली आहे. तो बस चालक आहे. त्याच्यासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस शिपाई सदानंद रुद्राक्षे यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथे एका ट्रॅव्हल्स मधून गुटखा वाहतूक केला जात असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा लावून ट्रॅव्हल्सची पाहणी केली. त्यामध्ये ४४९.५७ ग्रॅम अफू आणि प्रतिबंधित गुटखा आढळून आला. पोलिसांनी तब्बल २८ लाख पाच हजार ६८५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ट्रॅव्हल्स चालक श्रवणलाल याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा दाखल झालेल्या सहकाऱ्याने अफू दिल्याचे सांगितले. ते पुणे येथे पोहोचवायचे आहे. गुटखा हा राजस्थान ट्रॅव्हल्स कार्यालयातून दिला असून तो एका व्यक्तीला द्यायचा असल्याचे चालक श्रवणलाल याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी अन्य दोघांवर देखील गुन्हे दाखल केले आहेत. रावेत पोलीस तपास करत आहेत.
चिंचवडेनगरमध्ये अफू,पॉपी स्ट्रॉसह एकास अटक
अमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून एक लाख ६९ हजार १५४ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (५ फेब्रुवारी) चिंचवडेनगर येथे करण्यात आली.
पदमाराम सोनाराम देवासी (४९, बर्गेवस्ती, चिंबळीफाटा, ता. खेड, जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे. खंडणी विरोधी पथकातील पोलीस शिपाई विजय नलगे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे १०५.५ ग्रॅम अफू, ९२८.०९ ग्रॅम पॉपी स्ट्रॉ, दोन मोबाइल, वजनकाटा व दुचाकी असा एकूण एक लाख ६९ हजार १५४ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.
आईवरून शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा खून
आईवरून शिवीगाळ केल्याच्या रागातून एका तरुणाने अनोळखी व्यक्तीचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना सोमाटणे फाटा येथे गुरुवारी (५ फेब्रुवारी) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. खून झालेल्या तरुणाची ओळख पटली नाही. याप्रकरणी आकाश बालाजी शिंदे (वय २७, नोकरी, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सनी प्रमोद चव्हाण (२४, शिरगाव-गहुंजे, ता. मावळ, जि. पुणे) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अनोळखी तरुणाने आरोपी सनी चव्हाण याच्या आईवरून शिवीगाळ केली. त्याचा राग आल्याने आरोपीने दगडाने ठेचून अनोळखी तरुणाचा खून केला. घटनास्थळी दारूचे साहित्य आढळल्याने हा प्रकार दारू पिताना झालेला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहे.

