पिंपरी : चारधाम यात्रेतील बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा, हॉटेलनोंदणी आणि स्वस्त सहलीचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक केली जात आहे. अधिकृत भासणारे बनावट संकेतस्थळ तयार करून भाविकांकडून पैसे उकळले जात असल्याने पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भाविकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. चारधाम यात्रेसाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक उत्तराखंडमध्ये दाखल होतात. पिंपरी-चिंचवडमधूनही अनेकजण यात्रेचे नियोजन करतात. ही गर्दी आणि भाविकांची घाई लक्षात घेऊन सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा नवा मार्ग अवलंबला आहे. गुगलवर चारधाम हेलिकॉप्टर सेवा, हॉटेलनोंदणी किंवा सहलीचे पॅकेज शोधल्यानंतर काही बनावट संकेतस्थळे समोर येतात.
ती संकेतस्थळे अधिकृत असल्याचा भास निर्माण केला जातो. आकर्षक दर आणि मर्यादित वेळेच्या सवलती दाखवून भाविकांना तातडीने नोंदणी करण्यास प्रवृत्त केले जाते. पैसे ऑनलाइन भरल्यानंतर मात्र नोंदणी होत नाही. संबंधित व्यक्तीशी संपर्कही होत नाही. समाजमाध्यमावर अशा जाहिराती मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. काही जाहिरातींमध्ये हेलिकॉप्टर तिकीट, तातडीने दर्शन आणि हॉटेलची सुविधा स्वस्तात देण्याचे आमिष दाखवले जाते. भाविकांनी अशा जाहिरातींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हेलिकॉप्टरचे तिकीट काढताना अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा. समाजमाध्यमातून आलेल्या अनोळखी लिंकवरून नोंदणी करू नये. अतिशय स्वस्त दरात सेवा देण्याचे आमिष दाखवले जात असल्यास अधिक सतर्क राहावे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकावर किंवा वैयक्तिक बँक खात्यावर पैसे पाठवू नयेत. चारधाम यात्रा नोंदणी आणि अधिकृत माहितीसाठी उत्तराखंड पर्यटन विभागाच्या क्रमांकावर संपर्क साधावा. सायबर फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी ओटीपी, बँक खात्याची माहिती, एटीएम कार्डचे तपशील, सीव्हीव्ही किंवा यूपीआय पिन कोणालाही देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
चारधाम यात्रेला जाणाऱ्या भाविकांनी सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकू नये. कोणत्याही अनोळखी लिंक किंवा समाजमाध्यमावरील मोहात पाडणाऱ्या जाहिरातींवर विश्वास ठेवून पैसे पाठवू नये. केवळ अधिकृत संकेतस्थळ व शासकीय क्रमांकांचाच वापर करा. फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवडच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केली आहे.
