पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात भटक्या श्वानांची संख्या सुमारे एक लाख असताना महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून दर वर्षी केवळ दाेन ते तीन हजार श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात येत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. मागील सव्वाचार वर्षांत केवळ १२ हजार ४३० श्वानांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात भटक्या श्वानांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. भटके श्वान समूहाने फिरतात. रात्री किंवा पहाटेच्या वेळी वाहनचालकांच्या अंगावर धावून जातात. दर महिन्याला दोन हजारांहून अधिक श्वान हल्ल्यांचे रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळे श्वानांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिकेकडून श्वान निर्बिजीकरण उपक्रम राबविला जात आहे. मात्र, त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मागील सव्वाचार वर्षांत केवळ १२ हजार ४३० श्वानांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया केली आहे. श्वानांची संख्या वाढत असताना निर्बिजीकरण शस्त्रक्रियेचे प्रमाण अत्यल्प असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

करोना कालावधीत निर्बिजीकरण सर्वाधिक

करोना साथीच्या २०२०-२१ मध्ये २१ हजार ७३७, २०२१-२२ मध्ये १२ हजार ६९८ श्वानांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया केल्याची महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडे नाेंद आहे. यासाठी तीन काेटी ३५ लाख रुपये खर्च झाले आहेत. त्यानंतर दोन वर्षे सामाजिक दायित्व निधीतून खर्च करण्यात आला. ऑगस्ट २०२५ पासून श्वान निर्बिजीकरण शस्त्रक्रियेचा खर्च पुन्हा महापालिकेमार्फत सुरू करण्यात आला आहे. एका श्वानाच्या निर्बीजीकरण शस्त्रक्रियेसाठी अंदाजे ११०० रुपये खर्च येत असल्याचे या विभागाकडून सांगितले जात आहे.

माहिती देण्यास टाळाटाळ

मागील वर्षभरात श्वान निर्बिजीकरणावर किती खर्च केला, एक शस्त्रक्रियेसाठी नेमका किती खर्च येताे, याची पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. अरुण दगडे यांना माहिती देता आली नाही. त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.

निवारागृहाचा अभाव

शहरात अंदाजे एक लाख भटके श्वान आहेत. सार्वजनिक ठिकाणी असलेले मोकाट, भटके श्वान ठेवण्यासाठी महापालिकेकडे निवारागृह नाहीत. सद्य:स्थितीत एकही निवारागृह नाही. त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागणार आहेत. निवारागृह निर्माण केले जाणार असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांनी सांगितले.

आर्थिक वर्ष निर्बिजीकरण शस्त्रक्रिया

२०२२-२३ / १४२१
२०२३-२४ / ३५९८
२०२४-२५ / ३३४६
२०२५-२६ / २९२८
२०२६ / ११३७ (जुलैअखेर)
एकूण – १२ हजार ४३०

भटक्या श्वानांवरील निर्बिजीकरण शस्त्रक्रियेच्या नावाखाली मागील काही वर्षांत काेट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे. राजकीय नेत्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना याचे काम दिले जाते. या संस्था प्रत्यक्षात निर्बिजीकरण शस्त्रक्रिया न करता कागद रंगवून काेट्यवधी रुपयांची देयके काढतात. श्वान निर्बिजीकरण शस्त्रक्रिया हे भ्रष्टाचाराचे कुरण बनल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे.