पिंपरी : मागील सव्वा महिन्यापासून शहरात सुरू असलेली १५ टक्के पाणीकपात रद्द करण्यावरून सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम असल्याचे बुधवारी दिसून आले. पाणी कपात रद्द केल्याची घोषणा महापौरांनी केल्याचे भाजपच्या शहराध्यक्षांनी सांगितले, तर पाणी कपात रद्द करण्याची केवळ सूचना दिल्याचे महापौर, सभागृह नेत्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पाणीकपात रद्द होणार की नाही, याबाबत अस्पष्टता निर्माण झाली आहे.

महापाैर रवी लांडगे, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, सभागृह नेते प्रशांत शिताेळे यांनी विविध विषयांसदर्भात बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यंदा जून महिन्यामध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे १९ जूनपासून जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार शहरात १५ टक्के पाणीकपातीचा निर्णय लागू करण्यात आला आहे. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून झालेल्या जोरदार पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठा शंभर टक्के झाला आहे. त्यामुळे १९ जूनपासून सुरू असलेली १५ टक्के पाणीकपात रद्द हाेण्याची अपेक्षा शहरवासीयांना हाेती. सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी पाणीकपात रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावर पाणीकपात रद्द केली जाणार असल्याचे सत्ताधारी भाजपने स्पष्ट केले होते. याबाबत मंगळवारी पदाधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली.

ऑक्टोबरपर्यंत पवना धरणात शंभर टक्के पाणीसाठा असेल, तरच १५ टक्के पाणीकपात रद्द केली जाईल. अन्यथा ही पाणीकपात पुढे कायम राहील, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. जलसंपदा विभागाने कपात केली असून, रद्द करण्याचा अधिकार त्यांचा आहे. त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे पाणीपुरवठा विभागाने बैठकीत स्पष्ट केले. त्यावर पदाधिकाऱ्यांनी तातडीने जलसंपदा विभागाशी संवाद साधून पाणीकपात रद्द करण्यासाठी पाठपुरावा करण्याचा आदेश दिला आहे.

साडेसहा वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा

समन्यायी पाणीवाटपाचे कारण देत महापालिका प्रशासनाने २५ नाेव्हेंबर २०१९ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. ताे साडेसहा वर्षांनंतरही कायम आहे. अनियमित, अपुरे आणि कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. भामा आसखेडचे पाणी येईपर्यंत एक दिवसाआडच पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

पवना धरणात शंभर टक्के पाणीसाठा असून, शहरात सुरू असलेली १५ टक्के पाणीकपात रद्द करण्याची सूचना प्रशासनाला केली आहे. प्रशासनाची जलसंपदा विभागाबरोबर चर्चा सुरू आहे. एक ऑगस्टपासून जलतरण तलाव सुरू करण्यात येणार आहेत, असे महापौर रवी लांडगे यांनी सांगितले. शहरातील पाणीकपात रद्द करण्याची घोषणा महापौरांनी केली आहे.

त्यानुसार पाणीकपात रद्द हाेईल, असा दावा भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी केला. धरणात ऑक्टाेबरअखेर शंभर टक्के पाणीसाठा असल्यास पुढील वर्षभराचे नियाेजन जलसंपदा विभागाकडून केले जाते. मात्र, पदाधिकाऱ्यांनी १५ टक्के पाणीकपात रद्द करण्यासाठी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करावा, अशी सूचना केली आहे. त्यानुसार पाठपुरावा सुरू असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमाेद ओंभासे यांनी सांगितले.