पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील उपाहारगृहामधील अन्नाच्या दर्जाबाबत गंभीर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन आणि अस्वच्छता आढळून आल्यामुळे प्रशासनाने उपाहारगृह चालकाला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. काही अन्नपदार्थांचे नमुनेही तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. या कारवाईला रुग्णालय प्रशासनाने दुजाेरा दिला आहे.

महापालिकेच्या ‘वायसीएम’ रुग्णालयात दररोज उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे गेल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन ‘एफडीए’च्या विशेष पथकाने रुग्णालयाच्या उपाहारगृहामध्ये अचानक छापा टाकला. तपासणीदरम्यान अस्वच्छता, निकृष्ट दर्जाचे साहित्य आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. तपासणी पथकाने उपाहारगृहामधून भेसळीच्या संशयावरून चार वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे नमुने घेतले असून, ते तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठवले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार संबंधितचालकावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे ‘एफडीए’ने स्पष्ट केले आहे.

महापालिकेच्या उपाहारगृहाची तपासणी करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारातही एका खासगी एजन्सीच्या माध्यमातून उपाहारगृह चालविले जाते. या उपाहारगृहामध्येही माेठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याच्या तक्रारी अधिकारी, कर्मचारी करत आहेत. त्यामुळे या उपाहारगृहाचीही एफडीएच्या पथकाने तपासणी करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.