भारतीय जनता पक्षाच्या उषा मुंढे यांनी महापौर शकुंतला धराडे यांचा पराभव केला आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. सप्टेंबर २०१४ मध्ये शकुंतला धराडे या महापौरपदी विराजमान झाल्या होत्या. अत्यंत साध्या कुटुंबातून येऊन महापौर झालेल्या धराडे यांचा यापदापर्यंत येण्याचा प्रवास कष्टप्रद आणि कौतुकास्पदही आहे. आपल्या हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना शेतमजुरी देखील करावी लागली होती. त्यानंतर, बचतगटाच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांचे जाळे उभे केले आणि त्या राजकारणात आल्या. महिलांच्या समस्या जाणून घेणे आणि त्या सोडवणे हे काम त्या अत्यंत निष्टेने करत. महापौर झाल्यानंतर त्यांनी आपला कष्टप्रद प्रवास कसा झाले याबाबत सांगितले होते.
[jwplayer fgQbkpko]
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे आरक्षण मिळाले, त्यातूनच ही संधी मिळाली. नगर जिल्ह्य़ातील श्रीरामपूर येथे सामान्य कुटुंबात माझा जन्म झाला. आम्ही तीन बहिणी, आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची. मात्र, वडिलांनी काहीही कमी पडू दिले नाही. भाऊसाहेब धराडे यांच्याशी लग्न झाल्यानंतर पिंपळे गुरव येथे आले. आर्थिक परिस्थितीशी झगडत असताना शेतमजुरीही केली. लक्ष्मण जगताप यांच्या प्रतिभा प्रतिष्ठानच्या माध्यमातून बचत गटाचे काम जोमात सुरू होते, त्यात सहभागी झाले. महिलांसाठी केलेल्या कामाची दखल जगतापांनी घेतली आणि आपल्याला राजकारण संधी दिली असे त्यांनी सांगितले होते. २००७ मध्ये त्यांनी पालिका निवडणुकीत उमेदवारी मिळाली आणि त्या निवडूनही आल्या. २०१२ मध्ये अनुसूचित जमातीच्या आरक्षित प्रभागातून त्या निवडून आल्या आणि २०१४ मध्ये महापौर झाल्या होत्या.
सहा वेळा नगरसेवकाचे पद भूषवलेल्या आर. एस. कुमार यांचाही पराभव झाला. आर. एस. कुमार हे गेल्या तीस वर्षांपासून सातत्याने जिंकत आले आहेत. यावेळी सातव्यांदा निवडणूक लढले होते. त्यांचा यावेळी पराभव झाला.
शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी आपली पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यांनी उभे केलेले अनेक उमेदवार निवडून आले. पिंपळे गुरव या त्यांच्या बालेकिल्ल्यात प्रभाग क्रमांक २९ मध्ये भाजपचे सर्व उमेदवार निवडून आले. परंतु, त्यांचा भाऊ राजेंद्र जगताप मात्र निवडून आला नाही.
[jwplayer IzHJpz84]