रोजगार उपलब्ध होण्यासाठी नवीन रिक्षा परवान्यांमध्ये महिलांसाठी पाच टक्केआरक्षण ठेवण्याचा निर्णय परिवहन विभागाने गेल्यावर्षी घेतला होता. त्यानुसार पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच एका महिलेला अबोली रिक्षाचा परवाना देण्यात आला आहे. गुलाबी रंग असलेली ही रिक्षा शहरामध्ये प्रथमच दिसणार आहे.

महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी रिक्षा परवाने देताना पाच टक्केआरक्षण ठेवण्यात आले आहे. परिवहन विभागाने डिसेंबर २०१५ मध्ये नवीन रिक्षा परवाने देताना महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. गुलाबी या विशिष्ट रंगाच्या रिक्षाला अबोली असे नाव देण्यात आले आहे. महिलांना रिक्षा परवाने देताना रिक्षा चालविण्याचा परवाना त्यांच्याकडे असणे अत्यावश्यक करण्यात आले आहे. परवाना दिलेली रिक्षा महिलेच्याच नावाने ठेवावी लागणार आहे. पिंपरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अंतर्गत पाच टक्के आरक्षण योजनेत सहा महिला रिक्षा परवान्यासाठी पात्र झाल्या आहेत. या सर्व सहा महिलांनी आरटीओ कार्यालयातून इरादा पत्र नेले आहे.

पात्र झालेल्या सहा महिलांमधून पहिला परवाना लांडेवाडी भोसरी येथील रिंकू वसंत म्हस्के यांना देण्यात आला आहे. रिंकू म्हस्के यांनी एम.एच. १४ सीयू ४९९४ क्रमांकाची अबोली अ‍ॅटो रिक्षा चालविण्यासाठी परवाना घेतला आहे. काही रिक्षा चालक महिलांनी रिक्षाचा रंग गुलाबी न ठेवता सध्या आहे तोच ठेवण्याची मागणी केली होती. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून रिक्षा परवाने वाटप करण्याचा घोळ सुरू होता. वाद निवळल्यानंतर पिंपरीत पहिल्यांदाच एका महिलेला अबोली रिक्षाचा परवाना मिळाला आहे. त्यामुळे शहरामध्ये गुलाबी रंगाच्या अबोली रिक्षातून प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे.पिंपरी येथील एका महिलेला अबोली अ‍ॅटो रिक्षाचा परवाना दिला आहे. आणखी पाच महिला इरादा पत्र घेऊन गेल्या आहेत. त्यांनाही लवकरच रिक्षा परवाने देण्यात येणार आहेत, असे पिंपरीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी सांगितले.

अनेक अल्पवयीन मुले रिक्षा चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालतात. त्यात परप्रांतीय मुलांचे प्रमाण जास्त आहे. त्यांना नियमावली माहिती नसते. त्यामुळे सिग्नल तोडण्याचे प्रकार सर्रासपणे केले जातात. अशा रिक्षांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे.

बाळासाहेब जगताप, नागरिक, आकुर्डी

रिक्षा चालक कोठेही रिक्षा थांबवतात. त्यामुळे इतर वाहनांच्या वाहतुकीला अडथळा होतो. त्यांना सांगायला गेले तर अरेरावीची भाषा केली जाते. पुणे-मुंबई महामार्गावर अशा रिक्षा चालकांचा नागरिकांना मोठय़ा प्रमाणावर त्रास आहे.

राजू सूर्यवंशी, नागरिक, घरकुल चिखली

रिक्षा चालकांसंबंधी तक्रारी आहेत. त्यांच्याकडून नियमभंग होत असल्याचेही प्रवाशांचे म्हणणे आहे. रहदारीला अडथळा ठरणाऱ्या आणि नियमाने प्रवासी वाहतूक न करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई केली जाईल.

अजित शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी