खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर असलेल्या सराईत गुन्हेगाराकडून एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे गुंडाविरोधी पथकाने जप्त केली असून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. उमेश चंद्रकांत केदारे (वय २८) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला पिंपरी-चिंचवडच्या पुनावळे परिसरातून अटक करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंडाविरोधी पथकाची टीम रात्री गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी जगदाळे आणि गेंगजे यांना माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार उमेश चंद्रकांत केदारे हा पुनावळे येथील एका हॉटेल समोर थांबला आहे. त्याच्याकडे पिस्तुल आणि जिवंत काढतुसे आहेत. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं, त्याच्याकडे एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे आढळली आहेत.
हेही वाचा – पुणे: सेवानिवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी पोलीस हवालदाराचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
आरोपी उमेश चंद्रकांत केदारे याच्यावर रावेत पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून झाल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस कर्मचारी विक्रम जगदाळे, नितीन गेंगजे आणि रामदास मोहिते यांच्या टीमने केली आहे.
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.