पुणे : पुणे स्टेशन परिसरात देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्या कोल्हापुरातील एकास बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तुल, पाच काडतुसे जप्त करण्यात आली.

जितेंद्र अण्णासाहेब हावले (वय ३२, रा. दत्तवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. हावले पुणे स्टेशन परिसरात पिस्तुल विक्रीसाठी आला होता. याबाबतची माहिती गस्त घालणारे पोलीस कर्मचारी ज्ञाना बडे आणि मनोज भोकरे यांना मिळाली. त्यानंतर सापळा लावून हावलेला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तुल आणि पाच काडतुसे सापडली.

हावलेने पिस्तुल कोणाला देण्यासाठी आणले होते, यादृष्टीने तपास सुरू आहे.

पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंडगार्डन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, उपनिरीक्षक राहुल पवार, मोहन काळे, प्रताप गायकवाड, नितीन जगताप, सुधीर घोटकुले आदींनी ही कारवाई केली.