पुणे : महापालिकेतील सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून कोणतीही तपासणी होत नसल्याने नागरिक थेट पिस्तुल घेऊन येत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. पाच दिवसांपूर्वी झालेल्या महापौर निवडीच्या निवडणुकीत काही पदाधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते चक्क पिस्तुल घेऊन महापालिकेत आले होते. तर शुक्रवारी मिळकतकर विभागात कामानिमित्त आलेल्या एका नागरिकाने कर्मचाऱ्यांसमोरच पिस्तूल काढत आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

या प्रकारामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान संबंधित तरुणाच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

महापालिकेती प्रशासकराज संपुष्टात येऊन नवनियुक्त सदस्य महापालिकेत आले आहे. चार वर्षांच्या प्रतिक्षेनंतर महापालिकेत लोकप्रतिनिधी दाखल झाले आहेत. पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांच्या उत्साही कार्यकर्तांची जा-ये मोठ्या प्रमाणात महापालिकेत वाढली आहे. पाच दिवसांपूर्वी महापालिकेत महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काही पदाधिकारी आणि त्यांच्या सोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी चक्क पिस्तुल आणले होते. कमरेला पिस्तुल लावलेले तीन ते चार जण सुरक्षारक्षकांच्या नजरेस पडले होते. मात्र त्यांना हटकण्याची हिंमत कोणीही केली नाही.

महापालिकेत प्रवेश देताना कोणतीही तपासणी केली जात नाही. पिस्तुल, चाकू तसेच इतर धोकादायक असलेल्या गोष्टी अगदी सहजपणे महापालिकेच्या आवारात आणल्या जाऊ शकतात. दररोज कामानिमित्त अनेक नागरिक महापालिकेत येत असतात. यामध्ये ठेकेदारांचाही समावेश असतो. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टिने आवश्यक ती खबरदारी घेतली जात नसल्याची कबुली खुद्द महापालिका आयुक्त नवल किशोर यांनी देखील दिली आहे.

दरम्यान, शुक्रवारी महापालिकेच्या मिळकतकर विभागात कामानिमित्त आलेल्या एका तरुणाने काम होत नसल्याने त्याच्याकडे असलेले पिस्तुल बाहेर काढत स्वत:च्या डोक्याला लावत आत्महत्या करण्याची धमकी दिली. अचानकपणे घडलेल्या या प्रकारामुळे महापालिकेत मोठा गोंधळ उडाला.

महापालिकेने जाहीर केलेल्या अभय योजनेचा लाभ घेण्याची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत होती. त्याचा लाभ घेण्यासाठी संबधित तरुण महापालिकेच्या मिळकतकर विभागात आला होता. या तरुणाकडून कर्मचाऱ्यांना थकबाकीबाबत विचारणा करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी मिळकतकराच्या थकबाकीबाबत माहिती दिल्यानंतर मिळकतकर अधिक असून वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही त्यावर ठोस निर्णय घेतला जात नसल्याची तक्रार करत हा तरुण संतप्त झाला. त्याने त्याच्याकडील पिस्तूल बाहेर काढत थेट स्वतःच्या डोक्‍याला लावले. ‘मी आता आत्महत्या करणार’ असे म्हणत तो कार्यालयाच्या बाहेर आला.

महापालिकेत अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सर्वच जण घाबरले. काही कर्मचाऱ्यांनी या तरुणाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, दरम्यान महापालिकेच्या सुरक्षा विभागाचे अधिकारी, कर्मचारी तेथे दाखल झाले. त्यांच्यासह एका नगरसेविकेने देखील संबंधित तरुणाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हा तरुण शांत झाला. हा प्रकार मिटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र घटनेचे गांर्भिय लक्षात घेत महापालिका प्रशासनाने संबंधित तरुणाच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती, अशी माहिती महापालिकेचे सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी दिली.

याबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना विचारले असता, तरुणाने पिस्तुल काढून स्वत:च्या डोक्याला लावून आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचे प्रकार घडल्याचे सांगितले. हा प्रकार गंभीर असून त्याच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली जाईल. तसेच संबधित तरुणाचे शस्त्र जप्त करण्याबाबत पोलीसांशी चर्चा केली जाईल. यापुढील काळात असे प्रकार घडू नयेत यासाठी सुरक्षा व्यवस्थेत आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहे. महापालिकेत येताना ‘मेटल डिटेक्टर’ लावले जातील. तसेच सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाईल, असेही आयुक्त राम यांनी सांगितले.