पुणे : सोसायटीच्या आवारात सायकल घेऊन जात असताना पिटबुल जातीच्या श्वानाने अकरा वर्षांच्या मुलावर अचानक झडप घालून चावा घेतल्याची घटना हडपसरमधील अमर कोर्टयार्ड सोसायटीत घडली. या घटनेत मुलगा जखमी झाला असून, सुरक्षितपणे बांधून न ठेवल्या प्रकरणी श्वानाच्या मालकाविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी हेमंत दामोदर गाढवे (वय ४८, रा. बनकर कॉलनी, आकाशवाणी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३ नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा अकरा वर्षांचा मुलगा समरजित हा सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या उद्यानामध्ये सायकल घेऊन जात होता. त्यावेळी सोसायटीच्या तळघरातून भुंकण्याचा आवाज आल्याने तो सायकलसह बाजूला थांबला. त्याचवेळी पिटबुल जातीच्या श्वानाने अचानक त्याच्यावर झडप घातली. मुलाच्या छातीवर उजव्या बाजूला चावा घेतल्याने तो जखमी झाला. त्याच्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. पाळीव श्वानाला सुरक्षितपणे बांधून ठेवणे आणि इतर नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही, याची खबरदारी न घेतल्याने श्वानाच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार टिळेकर या प्रकरणााचा पुढील तपास करत आहेत.
