शंभर टक्के ‘प्लेसमेंट्स’चे दावे खोटे

अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या केवळ ३२ टक्के विद्यार्थ्यांना नोकरी

अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या केवळ ३२ टक्के विद्यार्थ्यांना नोकरी
राज्यातील तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाची दुर्दशा पुन्हा एकदा समोर आली आहे. ‘शंभर टक्के प्लेसमेंट्स’बाबत शिक्षण संस्था करीत असलेले उरबडवे दावे खोटे असल्याचे सिद्ध झाले आहे. गेल्या वर्षी अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या राज्यातील अवघ्या ३२ टक्के विद्यार्थ्यांना, पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या अवघ्या ९ टक्के आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या १३ टक्केच विद्यार्थ्यांना रोजगार मिळू शकला आहे. ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’ला संस्थांनी दिलेल्या माहितीतूनच ही बाब समोर आली आहे.
राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचा दर्जा, विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता हा विषय गेली काही वर्षे सातत्याने चर्चेत आहे. विद्यार्थी रोजगारक्षम नसल्याची टीका कंपन्यांकडून सातत्याने करण्यात येत असते. यावर आता महाविद्यालयांकडून मिळालेल्या माहितीने शिक्कामोर्तब केले आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने राज्यातील महाविद्यालयांची पायाभूत सुविधांची मार्च २०१५ पर्यंतची माहिती गोळा केली. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या रोजगाराचीही (प्लेसमेंट्स) आकडेवारी गोळा करण्यात आली. कॅम्पस मुलाखती किंवा इतर माध्यमांतून महाविद्यालयातील किती विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर नोकरी मिळाली त्याची माहिती महाविद्यालयांनी द्यायची होती.
गेल्या वर्षी म्हणजे २०१५-१६ मध्ये राज्यातील अभियांत्रिकी पदवी (बीई) अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या अवघ्या २९ हजार ५४५ विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकली आहे. एकूण प्रवेशाच्या तुलनेत नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी अवघी ३२ आहे. पदविका अभ्यासक्रमाची (डिप्लोमा इंजिनीअरिंग) अवस्था आणखीच बिकट असल्याचे दिसून आले आहे. त्यातील ६ हजार ४८१ विद्यार्थ्यांना म्हणजेच अवघ्या ९ टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या १ हजार ५१४ विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली असून हे प्रमाण १३ टक्के आहे. खासगी संस्थांकडून संकेतस्थळे आणि विविध माध्यमांतून शंभर टक्के प्लेसमेंट्सचे दावे करण्यात येतात. मात्र प्रत्यक्षात खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांमध्येच प्लेसमेंट्सचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते.

‘व्यवस्थापना’ची स्थिती बरी
राज्यातील व्यवस्थापन अभ्यासक्रमांची स्थिती तुलनेने बरी असल्याचे दिसत आहे. व्यवस्थापन अभ्यासक्रमाची पदव्युत्तर पदवी (एमबीए / एमएमएस) घेणाऱ्या साधारण ४० टक्के विद्यार्थ्यांना वर्ष अखेरीपर्यंत नोक ऱ्या मिळाल्या आहेत. गेल्या वर्षी (२०१५-१६) व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठी ३३ हजार ५१९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यापैकी १३ हजार ३०२ विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली.

Untitled-26

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Placement agency not provided job

ताज्या बातम्या