scorecardresearch

पुण्यात आता दर महिन्याला ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा पुढाकार 

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे प्रत्येक महिन्याला रोजगार मोहीम अर्थात ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’चे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत पहिला ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या ११ जानेवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

पुण्यात आता दर महिन्याला ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा पुढाकार 
प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे : नोकरीसाठी इच्छुक तरुणांना नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने, उद्योगसमूह यांच्या माध्यमातून उत्तमोत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे प्रत्येक महिन्याला रोजगार मोहीम अर्थात ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’चे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत पहिला ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या ११ जानेवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून वेळोवेळी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांत रोजगार मेळावे आयोजित करून सर्व स्तरातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचाच पुढील टप्पा म्हणून आता प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात विविध पदांसाठी वेगवेगळ्या पात्रतेच्या उमेदवारांच्या तात्काळ नोकरभरतीची गरज असलेल्या कंपन्यांच्या प्रतिनिधींना उमेदवारांच्या थेट प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी निमंत्रित करण्यात येईल. प्रत्यक्ष मुलाखत देऊन पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना लगेचच नोकरीची संधी मिळेल.

हेही वाचा – अजित पवारांकडे काही तालुक्यांची सूत्रे द्या, शरद पवार यांच्याकडे कार्यकर्त्यांची मागणी

पुणे जिल्ह्यातील नोकरीसाठी इच्छुक तरुण-तरुणींनी  www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नावनोंदणी करावी.  होमपेजवरील नोकरीसाधक (जॉब सीकर) लॉगीनमधून युझर आयडी आणि सांकेतिक क्रमांकाद्वारे (पासवर्ड) लॉगिन करावे. लॉगिन केल्यानंतर डॅशबोर्डमधील ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर’ या बटनावर क्लिक करून प्रथम पुणे विभाग आणि नंतर पुणे जिल्हा निवडून त्यातील ‘फर्स्ट प्लेसमेंट ड्राइव्ह- पुणे’ या रोजगार मेळाव्याची निवड करावी. उद्योजकनिहाय रिक्तपदांची माहिती घेऊन पात्रतेनुसार रिक्त पदासाठी ऑनलाइन पद्धतीने पसंतीक्रम नोंदवणे आवश्यक आहे. 

ऑनलाइन नोंदणी केलेल्या उमेदवारांनी बुधवारी ( ११ जानेवारी) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहून या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी होऊन या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन प्रभारी सहाय्यक आयुक्त सागर मोहिते यांनी केले. 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-01-2023 at 17:49 IST

संबंधित बातम्या