scorecardresearch

हिरवा कोपरा : सदाबहार कण्हेर, तगर, शंकासुर

झाडे ऋतूची पर्वा न करता नेहमी फुलत राहतात

हिरवा कोपरा : सदाबहार कण्हेर, तगर, शंकासुर
झाडे ऋतूची पर्वा न करता नेहमी फुलत राहतात

काही व्यक्ती नेहमीच प्रसन्न असतात. तशीच काही झाडे ऋतूची पर्वा न करता नेहमी फुलत राहतात. बारमाही फुलणाऱ्या अनेक वनस्पतींपैकी एक कण्हेर; प्रकृतीने अतिशय कणखर, जमिनीत आठ-दहा फूट उंच होऊ शकते. पण छोटय़ा कुंडीतही फुलते. आयपोसेनेसी कुटुंबातील या कण्हेरीची पाने लांबट व निमुळती असतात अन् फांद्या लवचिक असतात. कोणत्याही प्रकारच्या हवामानात, कोणत्याही प्रकारच्या मातीत कण्हेर मजेत वाढते. रोपवाटिकेत गुलाबी, पांढरा, लिंबोणी, गर्द राणी अशी विविध रंगांची कण्हेरची रोपं मिळतात. गुलाबी एकेरी तसेच दुहेरी रंगांची कण्हेर सुंदर दिसतात. दुहेरी पाकळ्यांच्या कण्हेरीचे गुच्छ गुलाबासारखेच सुंदर दिसतात. फुलांना मंद गंध असतो. फुलांना रंग व गंध असला तरी त्यात मधुरस नाही. याच्या शेंगांमध्ये म्हाताऱ्या असलेल्या नाजूक बिया असतात. कण्हेरीच्या बोटाइतक्या जाडीच्या फांद्या कापून मातीत खोचल्यास रोप तयार होते. फुले येऊन गेल्यावर छाटणी केल्यास नवी फूट येऊन फुलांचे ताजे गुच्छ येत राहतात. आपण घरात लावत असलेले झाड आपल्या घराचे सदस्य असते. त्याचे गुण, वैशिष्टय़े, प्रकृती आपल्याला माहीत असणे आवश्यक असते. सहज वाढणारी सुंदर, सुगंधी फुले देणारी कण्हेर विषारी असते, हे बहुतेक लोकांना ठाऊक नसते. त्यामुळे फुले शक्यतो तोडू नयेत. पाने, फांद्या कात्रीने कापल्यास कात्री धुवून ठेवावी. ही फुले देवाला वाहू नयेत, असे माझी आई सांगत असे त्यामागे हेच कारण असावे. यातील ‘ऑलिएड्रीन’ या विषारी द्रव्यामुळे गुरेसुद्धा याला तोंड लावत नाहीत. म्हणूनच दुभाजकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर कण्हेर लावत. पूर्वी घरातील बैठय़ा खेळांमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘बिट्टय़ा’ म्हणजे कण्हेरीच्या कुटुंबातील झुडपाचे फळ. पिवळ्या, पांढऱ्या, अबोली रंगाच्या आकर्षक फुलांमुळे व तुकतुकीत कांतीच्या निमुळत्या सुंदर पानांमुळे बिट्टीचे झाड आकर्षक दिसते. कॅसकाबेला थिवेटीया हे याचे नाव व मेक्सिको मूळ गाव. झुडूप आठ-दहा फूट वाढते. याची हिरवी त्रिकोणी फळे वाळली की मिळतात त्या बिट्टय़ा. या झुडपातही विषारी द्रव्ये असतात. त्यामुळे कुंपणापाशी ही झुडपे लावलेली आढळतात.

ही गर्द हिरव्या तुकतुकीत पानांची, पांढऱ्या शुभ्र वक्राकार पाकळ्यांची तगर अनेक बंगल्यांच्या दारात, अगदी खेडय़ा पाडय़ातही, घरीदारी डवरलेली दिसते. हे झुडूप सात-आठ फूट उंच होते. दुहेरी पाकळ्यांची तगर छान दिसते. पांढऱ्या पानांची जात शोभेसाठी वा वाफ्याभोवती छोटी-छोटी हिरवी भिंत करण्यासाठी लावता येते. अगदी छोटय़ा चांदणीसारखी फुले असलेली बुटकी तगर आजकाल रोपवाटिकांमध्ये मिळते. तगरीची बोटभर जाडीची फांदी खोचल्यास नवे रोप तयार होते. ही फुले दिसतात छान,पण गंधहीन, विषारी असल्याने ही फुले देवाला वाहू नयेत. काही फुलपाखरांच्या आळ्या याची पाने खातात व विष पोटात ठेवतात, ज्यामुळे शिकारी पक्षी त्यांच्यापासून दूर राहतात. म्हणजे फुलपाखरांच्या आळ्यांना हे माहीत आहे,की  यात विषारी घटक आहेत, ज्यापासून त्या स्वत:चे संरक्षण करतात. निसर्गातली ही गुपिते आपल्याला निसर्ग अभ्यासातूनच उलगडत जातात. शंकासुर नावाने आपल्याला परिचित असलेले झुडूप, फेबेसी कुटुंबाचे सदस्य. नाजूक पर्णिका असलेली पाने अतिशय तजेलदार दिसतात अन् फुलांचे रंग मनोहारी उधळण करतात. लालुंगा केशरी, लालुंगा गुलाबी पिवळा असे अस्सल रंग उधळणारा शंकासुर बियांपासून सहज रुजतो. झुडपाच्या आजूबाजूला खूप रोपं उगवतात. भरभर वाढतात. फुलांचे तुरे हळूहळू खालपासून वर उमलत जातात. ऋतूची पर्वा न करता फुले येत राहतात. छाटणीनंतर ताज्या दमाची फूट येते. अनेक पक्ष्यांचे हे आवडते झुडूप आहे. विशेषत: याच्या शेंगा पायात धरून, सोलून बिया फस्त करताना पोपट पाहिले की मजा वाटते.

कण्हेर, बिट्टी, तगर, शंकासुर ही सदाबहार झुडपे, कंपन्यांची मोठी आवारं, कुंपणाच्या कडेस, वाहनांच्या वर्दळीच्या ठिकाणी लावावीत. देखभालीची अपेक्षा न करता फुलणे हे यांचे वैशिष्टय़. पण ही फुले झाडावरच पाहावीत हे उत्तम.

प्रिया भिडे

(सदस्य, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी)

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-05-2017 at 02:57 IST

संबंधित बातम्या