हिरवा कोपरा : सुगंधाचे गंधकोष मरवा, दवणा..

देवपूजेसाठी आवर्जून लागणारी आणखी एक सुगंधी वनस्पती मरवा.

अत्तरातील खास भारतीय सुगंध मोगरा, गुलाब, वाळा, चंदन, केवडा, दवणा, मेंदी असे अनेक आहेत.

 

सुगंध मन प्रसन्न करतो, आनंद देते म्हणूनच परसबागेत सुगंधी फुलांची झाडे आवर्जून लावली जातात. अनेक वनस्पतींच्या फुलात, पानात, खोडात, मुळात गंधकोष दडलेले असतात, हे आपल्याला प्राचीन काळापासून माहीत आहे. वनस्पतीपासून हा सुगंध वेगळा करून त्यापासून सुगंधी पाणी, तेल, अत्तरे बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत. उत्तर प्रदेशातील कन्नोज व ओडिसातील गंजम ही ठिकाणे अत्तरासाठी प्रसिद्ध आहेत. अत्तरातील खास भारतीय सुगंध मोगरा, गुलाब, वाळा, चंदन, केवडा, दवणा, मेंदी असे अनेक आहेत. त्यातील मोगरा, गुलाब तर परसबागेत असतातच. पण त्याचबरोबर घरातील मंगल कार्यात, पूजेसाठी, पाहुण्यांच्या स्वागतासाठी सहज वापरता येणारा दवणा, मरवा, वाळा सहज लावता येतात.

दवणाचे छोटे क्षूप असते. याच्या पाना, फुलांमध्ये सुगंधी द्रव्य असते. कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू या राज्यांमध्ये दवण्याची व्यापारी तत्त्वावर लागवड करतात. दवण्यापासून तेल काढतात, हे तेल खूप महाग असते. रानावनात भटकंती करताना खूप ठिकाणी रानदवणा आढळतो. पाने चुरगाळली असता सुगंध येतो.

देवपूजेसाठी आवर्जून लागणारी आणखी एक सुगंधी वनस्पती मरवा. मरव्याचे ही छोटे क्षूप असते. नाजूक सुगंधी पाने ही याची खासीयत. मरव्याची रोपं सावित्रीबाई फुले युनिव्‍‌र्हसिटीच्या पार्क्‍स अँड गार्डन रोपवाटिकेत मिळतात. छोटय़ा कुंडीत रोप लावता येते, ऊन आणि पाणी दोन्ही आवडते. मरव्याला नाजूक पांढऱ्या फुलांचे तुरे येतात, मधमाशांना ही फुले फार आवडतात. मरव्याच्या नाजूक काडय़ा मातीत खोचल्या तर नवीन रोपं तयार होतात, मुळातून नवीन फुटवे येतात, त्याची विरळणी करून नवीन रोपं करता येतात. ही सुगंधी भेट सगळ्यांनाच आवडते. मरव्याच्या डिक्षा पाण्यात घालून शोभेसाठी ठेवता येतात. पूर्वी मरवा वेणीत गुंफत असत. याचे उल्लेख दोन गीतांमध्ये आढळतात. ‘चला सख्यांनो हलक्या हाती नखा नखावर रंग भरा गं, वेणी गुंफा मदनबाण वर भवती हिरवा मरवा गं’ अन् ‘शालू हिरवा पाचू नी मरवा, वेणी तिपेडी घाला’ आता तिपेडी वेणी नाही. त्यावर फुलांची वेणी नाही अन् मरवाही फारसा दिसत नाही. पण मरव्याचा सुगंध फार सुंदर असतो. रोप सहज रुजते. फारशी देखभाल लागत नाही. आपल्या हाताशी ही नैसर्गिक गंधकुपी जरूर असावी.

गोकुळ अष्टमी, गणेश चतुर्थीला फुल बाजारात हमखास दिसतो केवडा. सोनसळी वर्णाचे, केतकी वर्ण म्हणजे काय ते सार्थपणे मिरवणारे केवडय़ाचे कणीस म्हणजे सुगंधाची लयलूट. समुद्राजवळील रेताड जमीन, दमट, खारी हवा याला आवडते. त्यामुळे कोकणासकट, भारतातील बहुतेक समुद्र किनाऱ्यालगत केवडय़ाची दाट वने आढळतात. तलवारीच्या पात्यासारखी लांब, काटेरी दात्याची पाने असल्याने, याची फुले/ कणीस काढणे फार कठीण असते. ओडिशा येथील गंजम येथे केवडय़ाची अत्तरासाठी लागवड केली जाते. दोनशे वर्षांपासून अत्तर बनवण्याची परंपरा व अत्तर बनवणारी कुटुंबे आहेत. स्टीम डिस्टीलेशन ने अत्तर बनवतात. उत्तम प्रतीच्या अत्तराचा भाव चार लाख रुपये किलो असतो! या प्रक्रियेत केवडय़ाचे पाणी, तेलही बनवतात. केवडा पाणी खाद्य पदार्थामध्ये, शाही बिर्याणीमध्ये वगैरे वापरले जाते. केवडय़ाचे एखादे रोप शोभेसाठी कुंडीत लावू शकतो, दणकट असल्याने फारशी देखभाल लागत नाही. जमिनीत मात्र आक्रमक रीत्या वाढते. त्यामुळे कुंडीतच लावावे. केवडय़ाची पानेही सुंदर दिसतात, कणीस मिळाले तर सोन्याहून पिवळे.

आपल्या नेहमीच्या वापरात असणारी सुगंधी वनस्पती वाळा. उन्हाळ्यात पाण्यात वाळ्याची जुडी लागतेच, सणावारात वाळ्याचे अत्तर अन् खसचे सरबतही लोकप्रिय आहे. वाळा आपल्या बागेत सहज लावता येतो. वाटिकेत रोपं मिळतात. कुंडीत, आडव्या क्रेटमध्ये, वाफ्यात सहज येतो. पाने नाजूक पात्यासारखी असतात. सुंदर दिसतात. मार्च-एप्रिलमध्ये पांढरे तुरे येतात. मग सुगंधी मुळे काढून वापरता येतात. उन्हाळा सुसह्य़ करण्यासाठी, मुळे काढून पुनरेपण व नवी रोपं करता येतात. उताराच्या जमिनीवर मातीची धूप थांबवण्यासाठी वापरतात. फार्म हाउस, गृहनिर्माण संस्था अगदी बाल्कनीत, कुंडीतही लावता येईल वाळा. माझी मैत्रीण मधुमती साठे यांनी दारात गणपतीच्या मूर्ती भोवती फ्रेम व दाराला घरच्या वाळ्याचे तोरण केले आहे. त्यावर थोडे पाणी शिंपडले की सुगंधी स्वागत होते. निसर्गप्रेमी व कलासक्त मधुमतीताईंकडून आपणही प्रेरणा घेऊ या, निसर्गातले गंधकोष घरी आणू या.

प्रिया भिडे

(सदस्य, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Plantation of fragrant plants in home garden

ताज्या बातम्या