पुणे : तब्बल ६६ कोटी ३० लाख रुपये खर्च करून बांधलेल्या, मंत्रालयानंतरची सर्वांत सुसज्ज हरित इमारत असा लौकिक असलेल्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस – पीओपी’ आच्छादन शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे कोसळले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे वादळ, वारा, पाऊस, अतिउष्णता, हवा आदींवर आधारित पर्यावरणपूरक बांधकामाबाबतचा प्रशासनाचा दावा फोल ठरला. तसेच हे आच्छादन कोसळून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या गाडीची काचही फुटली. कार्यालयातील कागदपत्रे वाऱ्याने उडाली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या ‘भव्यदिव्य’ अशा नूतन इमारतीचे उद्घाटन ७ ऑक्टोबर २०१७ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. या इमारतीसाठी तब्बल ६६ कोटी ३० लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लौकिकाचे छप्पर कोसळल्याचे पाहायला मिळाले. या पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील छताचे पीओपी आच्छादन कोसळले. त्याचा फटका जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या शासकीय वाहनाला बसला. डॉ. देशमुख यांच्या चारचाकीची मागील काच आच्छादन कोसळून फुटली. सुदैवाने त्या वेळी गाडीत कोणीही नव्हते. तसेच वाऱ्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कागदपत्रे उडाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वसाधारण शाखेचे नायब तहसीलदार श्रावण ताते म्हणाले, की नायब जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम डागडुजीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (पीडब्ल्यूडी) आहे. शुक्रवारी झालेल्या प्रकाराबाबत तत्काळ पीडब्ल्यूडी विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून संबंधित बांधकाम आणि वादळी पावसाच्या उपाययोजना संदर्भातील काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.