पुणे : राष्ट्रीय छात्र सेना महाराष्ट्र संचालनालयाने पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत (पीएमआयएस) राज्यातील एनसीसी छात्र, माजी छात्रांचा कौशल्य विकास, रोजगार क्षमतेला चालना देणारा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात पुणे आणि मुंबई येथे एकूण १५० जागांसाठी विशेष रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

एनसीसी महाराष्ट्र संचालनालयाने या बाबतची माहिती दिली. राज्यातील ३६ जिल्ह्यांतील २ हजारांहून अधिक शिक्षण संस्थांमध्ये १.५ लाखापेक्षा अधिक एनसीसी छात्र आहेत. उपक्रमांतर्गत एनसीसी महाराष्ट्र संचालनालय आणि लेमन ट्री हॉटेल्स यांच्यातर्फे पुण्यातील लेमन ट्री प्रीमियर सिटी सेंटर येथे १५ जून रोजी ५० जागांसाठी, तर मुंबईतील लेमन ट्री प्रीमियर येथे १६ जून रोजी १०० जागांवर इंटर्नशिपची संधी छात्रांना एनसीसीच्या सीनियर डिव्हिजन, सीनियर विंगमधील छात्र, माजी छात्रांना या शिबिरांमध्ये सहभागी होता येणार आहे. निवड होणाऱ्या उमेदवारांना मनुष्यबळ, विक्री, कार्यालयीन कामकाज, अन्न आणि पेय सेवा, खरेदी आणि साठा व्यवस्थापन अशा क्षेत्रांत प्रत्यक्ष काम करण्याची संधी दिली जाणार आहे. तसेच दरमहा मानधनासह प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि करिअर विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी पात्र महिला छात्रांना निवास व्यवस्था आणि अतिरिक्त सहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने प्रयत्न सुरू असल्याची माहिती संचालनालयाने दिली.

तंत्रज्ञान, उत्पादन, लॉजिस्टिक्स, वित्तीय सेवा, आदरातिथ्य आणि इतर उदयोन्मुख उद्योग क्षेत्रांतील कंपन्यांशी भागीदारी करून युवकांसाठी इंटर्नशिप आणि रोजगाराच्या सातत्यपूर्ण संधी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. तसेच ड्रोन पायलट प्रशिक्षण, सायबर सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, नागरी संरक्षण अशा क्षेत्रांमध्येही विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहेत, असे संचालनालयाने स्पष्ट केले. शिबिरात सहभागी होण्यासाठी पात्र छात्र, माजी छात्रांनी जवळच्या एनसीसी युनिटशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

एनसीसी हे नेहमीच शिस्तप्रिय, जबाबदार आणि सक्षम तरुण नागरिक घडवण्याचे एक व्यासपीठ राहिले आहे. आता नेतृत्व विकासाला रोजगारक्षमता, उद्योजकता आणि भविष्यवेधी कौशल्यांशी जोडून ही संकल्पना अधिक व्यापक करण्यात येत आहे. इंटर्नशिप, ड्रोन प्रशिक्षण, सायबर सुरक्षा कार्यक्रम, आपत्ती व्यवस्थापन उपक्रम, औद्योगिक भागीदारी यांच्या माध्यमातून प्रत्येक एनसीसी छात्र केवळ देशाची सेवा करण्यापलीकडे झपाट्याने बदलणाऱ्या व्यावसायिक वातावरणात यशस्वी होण्यासाठी सज्ज असावा, हा प्रयत्न आहे. त्यासाठी पुणे आणि मुंबईतील रोजगार मेळावे शिक्षणाकडून रोजगाराकडे जाणाऱ्या अर्थपूर्ण वाटा निर्माण करण्याच्या प्रयत्नांची सुरुवात आहेत, असेही संचालनालयाने स्पष्ट केले.