पुणे: केंद्र सरकारच्या पंतप्रधान इंटर्नशिप (कार्यप्रशिक्षण) योजनेच्या चालू वर्षातील तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. यात देशभरात ३१ हजार ४८० पेक्षा अधिक कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील तरुणांना मोठ्या कंपन्यांमध्ये ६९२ जागा उपलब्ध असून, त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
या योजनेंतर्गत १८ ते २५ वर्षे वय, भारतीय नागरिकत्व असलेले, किमान दहावी ते बारावी, आयटीआय, पदविका किंवा पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील. पूर्णवेळ नोकरी किंवा नियमित शिक्षण घेत असलेले उमेदवार या योजनेसाठी अपात्र असतील. मात्र, ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षण घेत असलेले उमेदवार पात्र ठरतील. या कार्यप्रशिक्षणाचा कालावधी ६ ते ९ महिने असून दरमहा ९ हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. कार्यप्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून, भविष्यात नोकरीसाठी त्यांना या अनुभवाचा फायदा होणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक सुरेश वराडे यांनी दिली.
या रिक्त जागांसाठी उमेदवारांना कार्यप्रशिक्षण करण्याची संधी उपलब्ध आहे. या कंपन्यांमध्ये अर्ज करण्यासाठी मर्यादित कालावधी असल्यामुळे उमेदवारांनी https://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (रास्ता पेठ पुणे) या कार्यालयास प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी क्रमांक ०२०-२६,१३३६०६, वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन वराडे यांनी केले आहे.
कंपन्यांनुसार जागा
पंतप्रधान कार्यप्रशिक्षण योजनेमध्ये जिल्ह्यामधील १० कंपन्यांमध्ये एकूण ६९२ जागा आहेत. त्यात ज्युबिलंट फूडवर्क्स १९२, बजाज ऑटो ३०९, भारत फोर्ज ७, रिलायन्स इंडिस्ट्रीज ३३, टेक महिंद्रा ४२, स्कोडा ऑटो व्होल्क्सवॅगन इंडिया १९, इमामी १५, फिनोलेक्स केबल्स ६०, कॉग्नीझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स १४, पिरामल फार्मा १ अशा जागा आहेत.
इस्रायलमध्ये नोकरीची संधी
राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या (एसएसडीसी) माध्यमातून देशातील नागरिकांना इस्रायलमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. इस्रायलमध्ये ‘होम बेस्ड केअरगिव्हर’ म्हणजेच घरगुती मदतनीस या क्षेत्रात ३ हजार ५०० रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इस्रायलमधील घरगुती मदतनीस या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार २५ ते ४५ वर्षे वयोगटातील असावा. तो किमान दहावी उत्तीर्ण असावा, तसेच इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान आवश्यक आहे. याशिवाय केअरगिव्हर किंवा परिचर्यासंबंधित प्रशिक्षण गरजेचे आहे. या भरतीप्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती https://maharashtrainternational.com या संकेतस्थळावरील ‘लेटेस्ट जॉब्स’ या विभागात उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा.
